पुणे: प्रेमविवाहाच्या कारणावरून झालेल्या वादात एका तरुणाच्या वडिलांच्या डोक्यात गज मारून खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना लोणी काळभोर भागात घडली. अरुण छबू चव्हाण (वय ४०, रा. चव्हाण वस्ती, थेऊर, ता. हवेली) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी, लोणी काळभोर पोलिसांनी चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून आठ जणांना अटक केली.
राज दादा शितोळे, शेखर दिलीप चव्हाण, रोशन दिलीप चव्हाण, दिलीप पंडीत चव्हाण, आईनाबाई दिलीप चव्हाण, पूजा शेखर चव्हाण, मनीषा दादा शितोळे, उज्ज्वला सावंत (सर्व रा. चव्हाण वस्ती, थेऊर, ता. हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सोनवणे यांच्या मुलाने एका तरुणीशी प्रेमविवाह केला होता. तरुणी आरोपींच्या नात्यातील आहे. तरुणीने प्रेमविवाह केल्यानंतर आरोपी चिडले होते.
शनिवारी (२२ नोव्हेंबर) सकाळी साडेसातच्या सुमारास आरोपी अरुण सोनवणे यांच्या घरासमोर आले. मुलीने प्रेमविवाह केल्याने आरोपींनी चव्हाण यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांना मारहाण केली. त्यानंतर आरोपी शेखर चव्हाण याने सोनवणे यांच्या डोक्यात गज मारला. या घटनेनंतर साेनवणे यांचा मुलगा तेथे आला.
आरोपींनी सोनवणे यांच्या मुलाला मारहाण केली. खुनाचा प्रयत्न, दहशत माजविल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्य़ात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक बिराजदार तपास करत आहेत.