

समीर भुजबळ
वाल्हे : मांडकी (ता. पुरंदर) येथील एका शेतकऱ्याने फक्त 52 गुंठे क्षेत्रात तब्बल 138 टन उसाचे उत्पादन घेतले आहे.
मांडकी गावातील अनेक शेतकरी मागील काही वर्षांपासून ऊस उत्पादनाकडे वळला आहे. येथील शेतकरी विविध प्रयोगातून ऊस उत्पादन घेण्यावर भर देतात. त्यातील अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांना यात यश मिळते. त्यातील एक रणजित शंकरराव जगताप हे आहेत. त्यांनी आपल्या प्रयोगातून 86032 या वाणाचे सुमारे सव्वा एकरातून 138.174 टन उसाचे उत्पादन घेतले आहे. याबाबत कृषी अधिकारी अनिल दुरगूडे, उप कृषी अधिकारी माधवी नाळे, साहाय्यक कृषी अधिकारी नंदकुमार विधाते यांनी माहिती दिली.
रणजित जगताप हे श्री सोमेश्वर साखर कारखान्याचे सभासद आहेत. ते वडिलोपार्जित शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा तसेच सेंद्रिय खताचा वापर करून शेती करतात. या उसासाठी जगताप यांनी दोन वेळेस उभी-आडवी नांगणी केली. दोन वेळा रोटर करून सरी काढली. सुरुवातीपासूनच ठिंबक सिंचनाचा वापर करीत 86032 रोप लागण केली. चार ड्रिंचिंग (आळवणी), चार रासायनिक, जैविक फवारण्या, तीन ट्रॉली कोंबडी खत, रासायनिक खताचे दोन डोस व बांधणीनंतर चार वेळा ठिंबक सिंचनच्या माध्यमातून वॉटर सोलेबल खते सोडण्यात आली. दरम्यान, रणजित जगताप यांनी महाधन 9:24:24 तीन बॅग, युरिया तीन बॅग, बेन्सल्फ 40 किलो यांचा वापर करीत, सागरीका 20 किलो वापर करीत बाळभरणीचा डोस दिला. बांधणीचा डोस 14-35-14 खतांच्या तीन बॅग, युरिया दोन बॅग, पोटॅश दोन बॅग, प्लॅन्टो 40 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो लिंबोळी दोन बॅग वापर केला.
मोठी बांधणीनंतर ठिंबक सिंचनच्या माध्यमातून 1 किलो बोरॉन, कॅल्शियम सात किलो, दोन वेळा पंधरा दिवसाच्या अंतराने व नंतर वीस दिवसानंतर, अमोनियम सल्फेट पंधरा किलो, दहा किलो 0.0.50, फॉसपेरीट ॲसिड 2 किलो, मॅग्नेशियम पाच किलो असे दोन वेळेस पंधरा दिवसांच्या अंतराने सोडण्यात आले. यानंतर, सुक्ष्म अन्नद्रव्ये वॉटर सोलेबल ठिंबक सिंचन माध्यमातून सोडले होते. चार लिटर जैविक खत दोन वेळा सोडले.
जगताप याच जमिनीत सलग चौदा वर्षांपासून उसाचे पीक घेत आहेत. पाच वर्षांपासून कुटी करून शेतामध्ये पाचटीचे योग्य नियोजन करतात. त्यातून दरवर्षी त्यांना जास्त उत्पादन मिळते. रणजित जगताप यांनी आपले चुलते मार्गदर्शक श्री. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वास (आबा) जगताप व वडील शंकरराव जगताप, मांडकी उपसरपंच अतुल जगताप, प्रगतीशील शेतकरी शिवाजी मोरे, सचिन गायकवाड, मयूर जगताप, चेतन जगताप, योगेश जगताप, अरविंद जगताप, शिवाजी साळुंखे, तेजपाल सणस, दीपक साळुंके, बाबू जगताप, संभाजी जगताप, सोमेश्वर कारखान्याचे अग््राी ओव्हरशियर चंद्रकांत गायकवाड, शेतकरी कृषी सेवा केंद्र मांडकीचे महादेव जगताप आदींनी मार्गदर्शन केल्याची सांगितले.
को- 86032 या जातीच्या उसाचे उत्तम नियोजन जैविक, सेंद्रिय व रासायनिक खतांचा योग्य वापर करून 52 गुंठे जमिनीत 138 टन उत्पादन काढले. आधुनिक पद्धतीने शेती केल्यानंतर शेतीचे उत्पन्न वाढते व शेती फायद्यामध्ये राहते, हे या वरून सिद्ध होते. तरुणांनी पारंपरिक पद्धतीची शेती करताना आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. विविध पिकांसाठी गरजेनुसार सेंद्रिय, रासायनिक, जैविक आदी खतांचा वापर करावा. पाण्याचे योग्य नियोजन करून शेतीचा व्यावसाय केला तर जास्त उत्पादन मिळते.
रणजित जगताप, प्रयोगशील शेतकरी, मांडकी