अभिजित आंबेकर, शिरूर
Ranjangaon Mahaganpati : अष्टविनायकांपैकी रांजणगाव येथील महागणपतीचे आठवे स्थान असून, माहात्म्य मोठे आहे. पुणे-अहिल्यानगर महामार्गावर असलेले हे अष्टविनायकांपैकी एक मोठे तीर्थक्षेत्र आहे. नवसाला पावणारा म्हणून महागणपती म्हणून ओळखले जात आहे.
महागणपती मंदिर ४०० वर्षांपूर्वीचे असून, त्याच्या दगडी गाभाऱ्याचे काम पेशवाईमध्ये झाले. सवाई माधराव पेशवे यांनी हे बांधकाम केले आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला दगडी ओवऱ्या श्रीमंत पेशव्यांचे सरदार मल्हारराव होळकर व महादजी शिंदे यांनी बांधलेल्या आहेत. लाकडी मंडपाचे काम इंदूर येथील सरदार किबे यांनी केले आहे. मंदिरासमोर दगडी नगारखाना व दगडी सरदार वेश व मंदिराच्या पुढे दगडी दीपमाळा प्राचीन वास्तूची आठवण करून देतात. चतुर्थी व अंगारक चतुर्थीला मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक येतात.
मंदिर पुणे-नगर मुख्य रस्त्यालगतच आहे आणि पूर्वाभिमुख आहे. मंदिराचे महाव्दार भव्य प्रेक्षणीय आहे. आतील प्रवेशव्दारावर जय-विजय नावाचे भव्य व्दारपाल आहेत. प्रवेशव्दाराच्या इमारतीवर पेशवेकालीन नगारखाना आहे. प्रवेशव्दारातून आत गेल्यावर पेशवेकालीन बांधणीचे मुख्य देवालय दिसते. मंदिरातील मूर्ती पूर्वाभिमुख असून, डाव्या सोंडेची आणि आसन मांडी घातलेली आहे. मूर्तीचे कपाळ रुंद आहे. दोन्ही बाजूंना रिध्दी-सिध्दी उभ्या आहेत. मंदिरातील श्रींची पूजा देव कुटुंबीयांमार्फत केली जाते.
प्राचीन काळी त्रेतायुगात गृत्समद ऋषींनी "गणाना त्वाम गणपती" या मंत्राची रचना केली. या मंत्राच्या जपाच्या आधी गृत्समद ऋषीचे नाव घेतले जाऊ लागले. एके दिवशी गृत्समद ऋषींना मोठी शिंक आली. यातून त्यांच्या शिंकेतून एक जास्वंदीच्या फुलासारखा लाल रंगाचा मुलगा बाहेर पडला. गृत्समदऋषींनी या मुलास आपला पुत्र मानले, "मी मोठा झाल्यावर त्रैलोक्य पादाक्रांत करून इंद्रासही जिंकेन" असे तो मुलगा गृत्समदऋषींना म्हणाला, तेव्हा गृत्समद ऋषींनी त्यास "गणांना त्वाम" या गणेशमंत्राचा उपदेश केला. पित्याने दिलेल्या मंत्राप्रमाणे त्या बालकाने पाच हजार वर्षे खडतर तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन गणेशाने त्याला प्रचंड सामर्थ्याचा वर दिला. त्याचप्रमाणे गजाननाने त्याला लोखंडरूपे सुवर्णाची नगरे दिली. "तुझ्याकडे असलेल्या तीन नगरांमुळे तुला त्रिपूर हे नाव प्राप्त होईल.'
एका शंकरावाचून तुझा पराभव कोणीही करणार नाही. तू या लोकी अनेक सुखे उपभोगल्यावर शिवशंकर एकाच बाणाने तुझ्या या त्रिपुरांचा नाश करेल व तुलाही मुक्ती मिळेल, असा वर विनायकाने दिला. गणेशाने दिलेल्या वरामुळे त्रिपुरासुर उन्मत झाला. त्याने अवघ्या त्रैलोक्याला हैराण करून सोडले. आपल्या पराभवामुळे गिरिकंदरी लपून बसलेल्या इंद्रासह सर्व देव त्रिपुराच्या वधाविषयी विचार करीत असता नारदमुनी तेथे प्रगट झाले व म्हणाले "त्रिपुराने हजारो वर्षे गजाननाची तपश्चर्या केली म्हणून त्याला एवढे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. तेव्हा तुम्ही सर्वजण गजाननाची तपश्चर्या करून त्याला प्रसन्न करून घ्या," असे सांगून नारदमुनींनी सर्व देवांस एकाक्षर मंत्राचा उपदेश केला. नंतर सर्व देव गणपतीची तपश्चर्या करू लागले. त्यांची निस्सीम तपश्चर्या पाहून गजानन प्रगट झाले, तेव्हा देवांनी गजाननाची आठ श्लोकांनी प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रम विनायकम स्तुती केली. संकटाचे निवारण होण्यासाठी देवांनी ही स्तुती केली म्हणून त्या अष्टश्लोकी स्तोत्राला "संकटनाशनम गणपती स्तोत्रम" असे नाव प्राप्त झाले.
देवास आश्वासन दिल्यावर ब्राह्मणाचे रूप घेऊन गजानन त्रिपुराकडे गेला व म्हणाला, राजा मी एक बाह्मण असून, चौसष्ट कलांचा अभ्यास केला आहे. म्हणून मला ''कलाधर'' असे म्हणतात. तेव्हा त्रिपुरासुर म्हणाला "हे कलाधरा, तू तूझी कला दाखव, तुझी कला पाहून मी प्रसन्न झालो तर मी तुला आपले प्राणसुध्दा देईन."कलाधर म्हणाला हे राजन मी तुला तीन उत्तम प्रकारची विमाने करून देतो. त्या विमानांतून तुला एका क्षणात वाटेल तिथे जाता येईल व जे काय मनात आणशील ते तुला प्राप्त होईल, तसेच एका शंकराशिवाय कोणालाही त्या विमानाचा भेद करता येणार नाही, ज्यावेळी शंकर एका बाणाने त्या तीन विमानांचा भेद करेल तेव्हा तुझाही नाश होईल. कलाधराने उत्तम प्रकारची तीन विमाने तयार केली. ती विमाने पाहून त्रिपुराला फार आनंद झाला व त्याने त्या कलाधरास काय पाहिजे ते मागावयास सांगितले तेव्हा कलाधराने कैलास पर्वतावरील गजाननाची चिंतामणी नावाची मूर्ती त्रिपुरासुराकडे मागितली. कलाधराची मागणी त्रिपुरासुरास अत्यंत तुच्छ वाटली, त्याने आपला दूत शंकराकडे पाठविला आणि उन्मत्तपणे चिंतामणी मूर्तीची मागणी केली. चिंतामणीची मूर्ती तुझ्यासारख्या उन्मत्त पुरुषास जन्मजन्मांतरीही लाभणार नाही, असा उलटा निरोप शंकराने त्रिपुरासुरास पाठवताच त्रिपुरासुर क्रोधित झाला व त्याने तत्काळ चतुरंग सेना एकत्रित करून मंदार पर्वतावर स्वारी केली.शंकर आणि त्रिपुरासुर यांच्यात तुंबळ युध्द सुरू झाले. त्रिपुरासुराने शंकराच्या सर्व सैन्याचा फन्ना उडवला आणि शेवटी फक्त शिवशंकर युध्दभूमीवर उरले, एकट्याने युध्द करून जय मिळणार नाही, असे वाटून शिवशंकर युध्दभूमी सोडून गिरिकंदरात गेले. शंकराचा पराभव झाल्याचे समजताच पार्वती मंदार पर्वत सोडून आपला पिता हिमालय याला शरण गेली.विजय प्राप्त झाल्यावर त्रिपुरासुर मंदार पर्वतावर आला असता तेथे त्याला सहस्र सूर्याप्रमाणे तेजस्वी चिंतामणीची मूर्ती सापडली, ती घेऊन त्रिपुरासुर मोठ्या आनंदाने परतत असताना त्याच्या हातातील मूर्ती अचानक नाहीशी झाली. मूर्ती नाहीशी झाली हा अपशकुन समजून त्रिपुरासुर दुःखी झाला.
देवांचा पराभव झाल्यामुळे त्रैलोक्यात अधर्म सुरू झाला व यज्ञयागादी कर्म बंद पडली, हा प्रकार पाहून शंकर इतर देवांसह त्रिपुरासुराच्या नाशाचा उपाय योजू लागले, तेव्हा नारदमुनी प्रगट होऊन शंकरास म्हणाले "महादेवा, युध्दास जातेवेळी तू प्रथम गजाननाचे पूजन केले नाहीस म्हणून तुला जय मिळाला नाही, त्यासाठी आधी गणपतीची आराधना कर, त्याला प्रसन्न कर आणि मग युध्दास जा, म्हणजे तुला जय मिळेल, शंकरास नारदमुनींचे म्हणणे पटले आणि दंडकारण्यात जाऊन शंकराने गजाननाची षडाक्षर मंत्रांनी आराधना केली, त्या वेळी शंकराच्या मुखातून एक दिव्य पुरुष उत्पन्न झाला व शंकरास म्हणाले, मीच गजानन आहे. मीच सृष्टीचे पालनपोषण करतो, मी तुजवर प्रसन्न झालो आहे. तुला जे जे वर पाहिजे असतील ते ते मागून घे" गजाननाचे भाषण ऐकून शंकरास आनंद झाला व त्याने गजाननाची स्तुती केली. स्तुती ऐकून गजानन म्हणाले, "शंकरा, माझ्या बीजमंत्राचा जप करून एक बाण अभिमंत्रित कर, तो बाण तू त्या राक्षसाच्या पुरांवर सोडलास म्हणजे त्याची तिन्ही पुरे एकदम नष्ट होतील; मग तू त्याचे सहज भस्म करशील," असे बोलत गणपतीने शंकराला आपले सहस्रनाम सांगितले. त्या सहस्रनामाचा जप केला असता कोणत्याही कार्यात जय होतो आणि सर्व इच्छा पूर्ण होतात, गजाननाकडून वर मिळाल्यावर शंकरास आनंद झाला. गजाननाच्या वरप्राप्तीनंतर शंकराने सर्व देवांस युद्धास बोलावले. त्रिपुरासुराचे व शंकराचे तुंबळ युध्द सुरू झाले. त्रिपुरासुराच्या नाशासाठी शंकराने पृथ्वीचा रथ केला, चंद्र-सूर्याची चाके लावली. ब्रह्मदेवाला सारथी विष्णूचा बाण आणि अश्विनीकुमारांना घोडे केले. एकाक्षर व षडाक्षर मंत्राच्या जपाने धनुष्य व बाण अभिमंत्रित केले. नंतर धनुष्यास बाण लावून तो कणापर्यंत ओढून सोडला. तेव्हा त्रिभुवनात एकदम विजेसारखा लख्ख प्रकाश पडला. त्रिपुराला मूर्च्छा येऊन तो खाली पडला आणि असुराच्या तिन्ही पुरांचे भस्न झाले. त्रिपुराच्या शरीरातून एक ज्योती निर्माण होऊन तिने शंकराच्या शरीरात प्रवेश केला व त्रिपुर मुक्त झाला, अशी आकाशवाणी झाली. त्या दिवसापासून शंकराला त्रिपुरारी हे नाव प्राप्त झाले. ही घटना कार्तिक शुध्द पौर्णिमेला क्षेत्र भीमाशंकर येथे घडली म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात.
भगवान शंकराने उन्मत्त झालेल्या त्रिपुरासुर राक्षसाचा वध करण्यासाठी युध्दापूर्वी श्री गणेशाची पार्थिव मूर्ती ज्या गावी स्थापन करून श्री गणेशाची घोर तपश्चर्या केल्याने श्री गणेशाने प्रसन्न होऊन दहा तोंडे व वीस हात अस्त्रासह असे महाकाय विराट दर्शन भगवान शंकराला दिले व त्रिपुरासुर राक्षसाचा वध करण्यासाठी एकाक्षर मंत्र देऊ केला तेच ठिकाण मणिपूर, जे आज श्रीक्षेत्र रांजणगाव महागणपती म्हणून ओळखले जाऊ लागले. तेव्हापासून या गणपतीस महागणपती संबोधण्यात येते.
१) पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर हे ठिकाण असून, पुण्यापासून ५१ किमी अंतरावर आहे.
२. विमानसेवा : पुणे विमानतळावर उतरल्यावर रस्तामार्गाने केवळ एका तासात देवस्थानमध्ये येता येते. आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळे भारतामधून व भारताबाहेरून विमानसेवा उपलब्ध आहे.
३. रेल्वेसेवा : पुणे स्टेशन, केडगाव, अहिल्यानगर व दौंड या रेल्वेस्थानकांवर उतरून रस्तामार्गाने देवस्थानमध्ये येता येते.
१) पुणे ते श्रीक्षेत्र रांजणगाव ५१ कि.मी.
२) छत्रपती संभाजीनगर ते श्रीक्षेत्र रांजणगाव १९५ कि.मी.
३) मुंबई ते श्रीक्षेत्र रांजणगाव २२० कि. मी.
४) नाशिक ते श्रीक्षेत्र रांजणगाव २४० कि. मी.
५) कोल्हापूर ते श्रीक्षेत्र रांजणगाव २८५ कि. मी.
* अभिषेक व्यवस्था दैनंदिन, वार्षिक, मासिक, यज्ञ व याग करण्यासाठी यज्ञमंडप, मोफत अन्नदान दररोज दुपारी १२.१५ ते २.३० व सायंकाळी ७.३० ते ९.00, दर्शनमंडप व सुसज्ज रेलिंगव्यवस्था, भव्य पार्किंगव्यवस्था, भाविकांना राहण्यासाठी अत्यल्प दराने भक्तनिवास, वैद्यकीय सेवा दैनंदिन 'ओपीडी' व रुग्णवाहिका, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, नयनरम्य स्वानंद उद्यान, २४ बाय ७ सर्व परिसरामध्ये सीसीटीव्हीव्दारे नियंत्रण, स्वच्छतागृहे आदी सुविधा आहेत.
१) नगारखाना इमारत : मंदिराचे मूळ बांधकाम पेशवाईकाळातील असल्यामुळे त्याचे मराठाशैलीचे बांधकाम व रचना कायम ठेवून सुंदर व आकर्षक नगारखाना इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीमध्ये ध्यानधारणेकरिता सभागृह आहे व पहिल्या मजल्यावर गणेशमूर्ती संग्रहालय तयार करण्याचे काम सुरू आहे. येथून दररोज पहाटे व संध्याकाळी आजही नगारा वाजविण्यात येतो.
२) दिवाणखाना इमारत : सांस्कृतिक कार्यक्रम व निवासासाठी ही इमारत बांधण्यात आलेली आहे. ही इमारत अतिशय देखणी व सोहम असून, मराठा वास्तुशास्त्राची वैशिष्ट्ये यामध्ये सामावलेली आहेत. या इमारतीमधील सांस्कृतिक सभागृह पेशवेकाळाची आठवण करून देते.
३) लाकडी सभामंडप : इंदूर येथील पेशव्यांचे सरदार किबे यांनी ४०० वर्षांपूर्वी दगडी मंदिरासमोर लाकडी सभामंडप बांधला होता, ज्याचे पुनरुज्जीवन विश्वस्त मंडळाने केले व त्याच जागेवर त्याच शैलीमध्ये नवीन आकर्षक लाकडी मंडप बांधला. यामुळे मंदिराच्या रचनेत कोणताही बदल न होता मंदिराचा आकर्षकपणा व भाविकांना अपेक्षित असलेली वातावरणनिर्मिती येथे झालेली दिसते. आज हा लाकडी मंडप भाविकांचे मन मोहून टाकतो.
४) प्रसाद भवन इमारत : भाविकांना दररोज सकाळ व संध्याकाळ भोजन प्रसादाकरिता २०० लोकांचे अद्ययावत असे सभागृह व स्वयंपाकगृह या इमारतीमध्ये आहे. दररोज सर्वसाधारण १५०० भाविक मोफत अन्नप्रसादाचा लाभ घेतात.
५) स्वानंद उद्यान : श्री गणेशाचे स्वर्गलोकीचे स्वानंद भूतलावर महागणपती मंदिराच्या सान्निध्यात उद्यानरूपाने बहरले आहे. अनेक भाविक या नयनरम्य उद्यानाचा व त्यातील आकर्षक कारंज्याचा आनंद लुटतात. शिरूर तालुक्यातील हे पहिले सार्वजनिक उद्यान आहे. त्यामध्ये हुबेहूब प्राण्यांच्या नयनरम्य प्रतिकृती ठेवण्यात आलेल्या आहेत.
१) अद्ययावत भक्तनिवास इमारत : सध्याच्या भक्तनिवस खोल्या अपुऱ्या असल्यामुळे मंदिरालगतच असणाऱ्या देवस्थानच्या ६६ आर जमिनीवर १२५ खोल्यांचे भक्तनिवास होणार आहे, हे भक्तनिवास बांधण्याचा खर्च २० कोटी रुपये अपेक्षित आहे.
२. भव्य सांस्कृतिक भवन : मंदिर परिसराची पुणे-अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर या महामार्गाला लागूनच असलेल्या जागेत भव्य सांस्कृतिक भवन करावयाचे असून, त्याखाली पार्किंग करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी अंदाजे १० कोटी खर्च अपेक्षित आहे.
३) मंदिर घाट व नौकानयन : मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा उपयोग करून दुतर्फा दगडी घाट बांधण्यात येणार असून, अडविलेल्या पाण्यामधून निर्माण होणाऱ्या जलाशयामध्ये नौकानयनाची सोय करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे मंदिराची शोभा वाढणार असून, पर्यटन केंद्र विकासासाठी मदत होणार आहे. या प्रकल्पाकरिता २ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
४) अद्ययावत रुग्णालय : भविष्यकाळाचा विचार करून पुणे-अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर या महामार्गावरील ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी अद्ययावत रुग्णालयाची नितांत गरज आहे. त्यामुळे देवस्थानतर्फे १०० खाटांचे रुग्णालय ऑपरेशन थिएटर व रिसर्च सेंटर बांधण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना अल्पदरात वैद्यकीय सेवा उपलब्ध होईल, तर महामार्गावरील अपघातग्रस्तास तातडीची सेवा मिळू शकेल. या रुग्णालय व संशोधन केंद्र इमारतीचा खर्च अंदाजे २३ कोटी रुपये अपेक्षित आहे.
५) पालखी मार्ग व व्दारयात्रा मार्ग रस्ते : उत्सवामध्ये महागणपतीची पालखी गावांमध्ये निरनिराळ्या भागांत जाते. त्याचप्रमाणे चार गावांना व्दारयात्रेकरिता पालखी जात असते. हे सर्व पालखी मार्ग व व्दारयात्रा मार्ग रस्ते डांबरीकरण करून भाविकांना सोय उपलब्ध करून देण्यासाठी अंदाजे खर्च १ कोटी रुपये एवढा अपेक्षित आहे.
6) शैक्षणिक संस्था इमारत : मंदिराजवळ अद्ययावत औद्योगिक क्षेत्र विकसित होत असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंग व सायन्स महाविद्यालय सुरू करण्यासाठी शैक्षणिक उपक्रमाचा फायदा अनेक ग्रामीण विद्यार्थी घेतील, असे अपेक्षित आहे. या शैक्षणिक इमारतीकरिता अंदाजे खर्च ९ कोटी रुपये एवढा अपेक्षित आहे.