

॥ ॐ गं गणपतये नमः॥
सुखकर्ता, दुःखहर्ता श्रीगणरायाचे आज आगमन होत आहे. विद्या, बुद्धिदाता आणि ऋद्धी-सिद्धीचा नायक म्हणून गणरायाची त्रिखंडात कीर्ती आहे. श्रीविनायकाला प्रथम वंदन करूनच सर्व कार्याचा आरंभ होतो. 'निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा' या प्रार्थनेला धावून येणारा विघ्नहर्ता गणराय याचे भक्तांच्या हृदयात चिरंतन वास्तव्य राहिले आहे. 'संकष्टी पावावे, निर्वाणी रक्षावे' या भाविकांच्या आर्त हाकेला गणरायाने नेहमीच प्रतिसाद दिलेला आहे. 'गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा' ही उक्ती सार्थ करणार्या भालचंद्राचा कथाकल्पतरू भाविकांना दिलासा देणारा ठरतो. 'न च विघ्नभयं तस्य' ही गणेश स्तोत्रातील ग्वाही भक्तमनाला नित्य उभारी देते. अनंत नाटक सूत्रधारक श्रीपार्वती नंदनाचा महिमा वर्णावा तेवढा थोडाच! 'देवा तुचि गणेशु, सकलमति प्रकाशु', अशी प्रार्थना संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी केली आहे. ओंकाररूपी श्रीगणेशाचा महोत्सव आजपासून सुरू होत आहे. या आनंद, हर्षोल्हासाच्या उधाणाचे गणरायाच्या मंगलमयचरणी कोटी कोटी वंदन!!
अनेक देव-देवतांनी, संतांनी आणि भक्तांनी श्रीगणेशाची प्रार्थना केली. त्याला आळविले. त्याची पूजा-अर्चा केली. तथापि, श्रीगणेशाने ब्रह्मा-विष्णू-महेशासह कोणा देव-देवतेची स्तुती केली, प्रार्थना केली, असा वेद-पुराणात कोठेही उल्लेख नाही. श्रीगणेशाचे असे हे स्वयंभू माहात्म्य आणि स्थान आहे.
ब्रह्मा-विष्णू-महेश-शक्ती आणि सूर्य हे पंचजगदीश्वर म्हटले जातात. त्यांच्या अनुग्रहासाठी श्रीगणेश जेथे प्रकट झाले, त्या क्षेत्रस्थळांना स्वायंभुव क्षेत्र म्हणतात. त्यात मयुरेश्वर (मोरगाव, जि. पुणे) हे सर्वश्रेष्ठ क्षेत्र मानले जाते. ब्रह्मा, विष्णू, महेश यांना त्रिमूर्ती म्हटले जाते. या त्रिमूर्तींच्या अनुग्रहासाठी गणेश प्रकटले, त्या स्थळांना ब्राह्मक्षेत्र म्हणतात. काशीचे ढुंढिराज क्षेत्र हे त्यातील सर्वश्रेष्ठ क्षेत्र. त्रिमूर्तीपैकी एकाच्या अनुग्रह स्थळाला प्राजपत्य क्षेत्र म्हणतात. त्यातील सर्वश्रेष्ठ क्षेत्र रांजणगाव महागणपती (जि. पुणे) हे आहे.
सर्व कार्यारंभी गणेशाचे पूजन केले जाते. ज्ञान आणि बुद्धीबरोबर गणेश देवता शौर्याचीही देवता आहे. चौसष्ठ कलांचा स्वामी म्हणूनही श्रीगणेश प्रख्यात आहे. सुखकर्ता, दुःखहर्ता हे त्याचे ब्रीदच आहे.