

अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्वर. या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. श्री मोरेश्वर गणेशाचे, हे स्वयंभू व आद्यस्थान आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. श्री मोरेश्वराच्या डोळ्यांत व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. या मंदिराभोवती बुरूजसदृश दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे.
मंदिराला पायऱ्या असून तेथेच नगारखाना व बाजूला पायात लाडू धरलेला उंदीर आहे. पुढे अकरा पायऱ्या चढून गेल्यावर एका दगडी चौथऱ्यावर काळ्या पाषाणातला, गणपतीकडे तोंड केलेला नंदी आहे. त्यापुढे दगडी कासव आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात कन्हा नदीच्या तिरावर उत्तराभिमुख असे हे मंदिर आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हा मोरगावपासून अगदी सतरा किलोमीटरवर आहे.