Ashatai Buchke Pudhari
पुणे

Ashatai Buchke: भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आशाताई बुचके यांचे निधन; जुन्नरमध्ये शोककळा

लढाऊ महिला नेतृत्वाची ओळख; शिवसेनेत १५ वर्षे कार्य, २०२१ मध्ये भाजपमध्ये प्रवेश

पुढारी वृत्तसेवा

नारायणगाव: भारतीय जनता पक्षाच्या जुन्नर तालुक्यातील ज्येष्ठ व लढवय्या नेत्या,माजी जिल्हा परिषद सदस्या तथा सामाजिक कार्यकर्त्या आशाताई दत्तात्रय बुचके यांचे मुंबई येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी (दि. १३) पहाटे पाच वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच जुन्नर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात आली. आशाताई बुचके( वय 58 वर्षे ) यांच्या पश्चात पती विवाहित मुलगा दोन विवाहित मुली व नातवंडे असा परिवार आहे. पुणे जिल्हा परिषदेत सलग चार वेळा त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम पाहिले तसेच गटनेत्या म्हणून प्रभावी काम केले. जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

आशाताई बुचके यांची जुन्नर तालुक्यात आक्रमक, स्पष्टवक्त्या आणि लढाऊ महिला नेत्या म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण झाली होती. विविध सामाजिक प्रश्न तसेच जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्या सातत्याने सक्रिय राहिल्या.

आशाताई बुचके यांनी राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात सुमारे १५ वर्षे शिवसेनेत काम केले. त्या पुणे जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या माजी गटनेत्या म्हणूनही कार्यरत होत्या. जुन्नर तालुक्यात महिलांचे प्रभावी नेतृत्व म्हणून त्यांनी आपली वेगळी छाप निर्माण केली होती.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर जुन्नर तालुक्यातील राजकीय घडामोडींमुळे त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडावे लागले. त्यानंतर ऑगस्ट २०२१ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही त्यांनी तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील आपला सक्रिय सहभाग कायम ठेवला.

त्या भाजप महाराष्ट्र राज्य समितीच्या सदस्य म्हणून तसेच पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य म्हणून कार्यरत होत्या. पुणे जिल्ह्यासह जुन्नर व आंबेगाव तालुक्यांमध्ये सामाजिक आणि राजकीय कामाच्या माध्यमातून त्यांनी आपला जनसंपर्क मजबूत केला होता. आशाताई बुचके यांच्या निधनामुळे जुन्नर तालुक्यातील आक्रमक आणि लढाऊ महिला नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT