पुणे: बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या एका तरुणाला गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. मंगळवार पेठेत ही कारवाई करण्यात आली आहे.
रमजान ऊर्फ टिपू आदम पटेल (वय ३३, रा. भाजी बाजार, शिरूर, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्यावर फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट १ मधील पोलिस कर्मचारी हेमंत पेरणे आणि नीलेश साबळे हे मंगळवार पेठेत गस्त घालत होते. कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाजवळील कोंबडी पुलाजवळ पटेल थांबला होता. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती त्यांना मिळाली.
त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि काडतूस सापडले. पटेलने पिस्तूल का बाळगले, तसेच त्याने कोणाकडून आणले ? यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहेत.
ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अजित जाधव, उपनिरीक्षक राहुल मखरे, पोलिस अंमलदार हेमंत पेरणे, नीलेश साबळे, शशिकांत दरेकर, नितीन जाधव, अनिकेत बाबर, शुभम देसाई, अभिनव लडकत, मयूर भोसले, उमेश मठपती यांच्या पथकाने केली.