पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पावले आपल्या वास्तूला लागणार, या आशेने गर्दी करीत मोठ्या कुतूहलाने इतिहासप्रेमी मंडळी मोठ्या संख्येने सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधक मंडळात कडक पोलिस बंदोबस्तात श्वास रोखून बसली होती. तब्बल ३ तासांच्या प्रतीक्षेनंतर पाहुणे आले, त्यांचा सत्कार झाला, पाहुण्यांनी कळ दाबून संकेतस्थळाचे उद्घाटन केले अन् कार्यक्रम सुरू होताच आभार प्रदर्शन उरकण्यात आले! पाहुणे घाईत उठून आल्यापावली निघून गेले. हा सर्व प्रकार पाहून इतिहासप्रेमी मात्र अवाक झाले. पाहुण्यांनी दोन शब्द बोलायला हवे होते, अशा प्रतिक्रिया व्यक्त करीत जडपावलांनी लोक निघून गेले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पुणे शहरात सोमवारी (दि. १६) तीन कार्यक्रम नियोजित होते. मात्र, प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम लांबत गेला. त्यामुळे भारत इतिहास संशोधक मंडळात शहा यांना येण्यास खूप उशीर झाला. दुपारी १२.५० वाजताच्या कार्यक्रमास पाहुणे दुपारी २.२५ वाजता आले.
गृहमंत्री शहा यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजूषा नागपुरे यांची उपस्थिती होती. गृहमंत्री शहा यांना येण्यास उशीर होत असल्याने श्रोते कंटाळले होते.
त्यामुळे इतिहास संशोधक मंदार लवाटे यांनी या ठिकाणचा इतिहास अन् संघर्ष सांगितला. तसेच, या वास्तूत दिग्गज लोक येऊन गेल्याची आठवण सांगितली. बाहेर प्रचंड मोठा पोलिस बंदोबस्त होता. त्यामुळे आलेल्या श्रोत्यांना बाहेर जाण्याची परवानी नव्हती. सदाशिव पेठेतील सर्व दुकाने बंद करून तेथे चारही बाजूंनी परिसरात कमांडो अन् शहर पोलिस तैनात होते. सुमारे पाच ते सहा तास या परिसरात वातावरण होते.
...अन् इतिहासप्रेमी नाराज झाले
दुपारी २.२५ वाजता शहा यांचे आगमन झाले. त्यांनी ऐतिहासिक कागदपत्रांच्या डिजिटायझेशन प्रकल्पाचे लोकार्पण केले. सुमारे ६.५ लाख कागदपत्रांच्या इमेजेस लवकरच उपलब्ध होणार आहेत. त्यांनी सभागृहात येताच थेट श्रोत्यांत जाऊन सर्व इतिहासप्रेमींशी हस्तांदोलन केले अन् व्यासपीठावर बसले. मात्र, लगेच सर्व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर शहा यांनी कळ दाबून मंडळाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन केले अन् कार्यक्रम संपला, असे जाहीर करण्यात आले. त्यामुळे जमलेल्या इतिहासप्रेमींची निराशा झाली. अत्यंत जडपावलांनी सर्वांनी सभागृह सोडले.