

पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलने शैक्षणिक वर्ष २०२७-२८ साठी पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. पुढील वर्षी २१ सीईटी परीक्षा घेण्यात येणार असून, त्यापैकी ११ अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा परीक्षा देण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
पाटील म्हणाले, पुढील वर्षी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (PGDM), पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन मॅनेजमेंट (PGCM) आणि जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी (GNM) या तीन अभ्यासक्रमांच्या सीईटी प्रथमच घेतल्या जाणार आहेत.
जानेवारी महिन्यात परीक्षा सुरू होऊन १० जून २०२७ पर्यंत विविध सीईटी परीक्षा पार पडणार आहेत. २०२६ मध्ये घेतलेल्या २० सीईटी परीक्षांसाठी १८ लाख १४ हजार ४५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर १६ लाख ३१ हजार ३३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. परीक्षेच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने दोन वेळा सीईटी घेण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांची संख्या तीनवरून ११ केली आहे.
राष्ट्रीय स्तरावर जेईई मेन्सच्या दोन परीक्षा घेतल्या जात असल्याने विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळतात. याच धर्तीवर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाही दोन संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मागील वर्षापासून पीसीएम, पीसीबी आणि एमबीए/ एमएमएस या तीन अभ्यासक्रमांच्या सीईटी दोन वेळा घेण्यात येत आहेत. आणखी आठ अभ्यासक्रमांचा समावेश केला आहे. दोन्ही परीक्षा दिल्यास प्रवेशासाठी विद्यार्थ्याच्या ज्या परीक्षेत अधिक पर्सेंटाइल गुण असतील, तेच गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.