Malabar Group Cleanliness Drive: मलाबार ग्रुपच्या स्थापना दिनानिमित्त पुण्यात स्वच्छता मोहीम; ९ हजार कर्मचाऱ्यांचा देशव्यापी सहभाग

पिंपरीतील एच. ए. ग्राउंड आणि येरवड्यातील तारकेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता अभियान; वर्षभरात देशभरात एक लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट
Malabar Group Cleanliness Drive
Malabar Group Cleanliness DrivePudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: मलाबार ग्रुपच्या ३४ व्या स्थापना दिनानिमित्त देशभरात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या पिंपरी-चिंचवड आणि विमाननगर येथील शोरूमच्या वतीने पुण्यातील दोन ठिकाणी स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली. पिंपरी येथील एच. ए. ग्राउंड आणि येरवडा येथील तारकेश्वर मंदिर परिसरात हा उपक्रम राबविण्यात आला.

महानगरपालिका आणि नगरपालिका यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेत मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे व्यवस्थापन अधिकारी, शोरूम प्रमुख, कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सर्वांनी एकत्र येत परिसराची स्वच्छता केली आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला.

पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि सुशासन (ESG) या तत्त्वांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मलाबार ग्रुपकडून देशव्यापी स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या मोहिमेत देशभरातील ग्रुपच्या ९ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.

यावेळी मलाबार ग्रुपचे अध्यक्ष एम. पी. अहमद म्हणाले, "पर्यावरणाची जबाबदारी, सामाजिक बांधिलकी, पारदर्शकता आणि सुशासन या मूल्यांना कंपनीच्या कार्यपद्धतीत महत्त्वाचे स्थान आहे. ESG तत्त्वांना अधिक बळकटी देण्यासाठी ग्रुप सातत्याने प्रयत्नशील आहे. पर्यावरणीय शाश्वततेच्या दिशेने आणखी एक पाऊल म्हणून येत्या वर्षभरात देशभरात सुमारे एक लाख वृक्षांची लागवड करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे."

व्यावसायिक विस्तारासोबतच सामाजिक विकासासाठीही मलाबार ग्रुपकडून विविध उपक्रम राबविले जातात. समाजातील वंचित आणि गरजू घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी ग्रुपने अनेक सामाजिक योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये 'हंगर फ्री वर्ल्ड' या भूकमुक्ती अभियानाचा, वंचित मुलांसाठी मायक्रो लर्निंग सेंटर्सचा, मुलींसाठी शिष्यवृत्ती योजनेचा आणि ज्येष्ठ महिलांसाठी 'ग्रँडमा होम्स' या उपक्रमाचा समावेश आहे. या माध्यमातून शिक्षण, अन्नसुरक्षा आणि महिला सक्षमीकरणासाठी योगदान देण्याचा ग्रुपचा प्रयत्न आहे.

मलाबार गोल्ड अँड डायमंड्सविषयी

मलाबार गोल्ड अँड डायमंड्सची स्थापना १९९३ मध्ये झाली असून, ही मलाबार ग्रुपची प्रमुख कंपनी आहे. वार्षिक ९.४१ अब्ज अमेरिकी डॉलर उलाढाल असलेला हा समूह विविध व्यावसायिक क्षेत्रांत कार्यरत आहे. कंपनीच्या माहितीनुसार, मलाबार गोल्ड अँड डायमंड्स ही जागतिक स्तरावरील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी ज्वेलरी रिटेल कंपनी आहे. कंपनीचे १४ देशांमध्ये ४५० हून अधिक शोरूम्सचे जाळे आहे.

भारतासह मध्य पूर्व, दक्षिण-पूर्व आणि पूर्व आशिया, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये कंपनीची कार्यालये, डिझाइन केंद्रे, घाऊक विक्री केंद्रे आणि उत्पादन सुविधा आहेत. ३,५०० हून अधिक भागधारकांच्या मालकीच्या या समूहात २६ पेक्षा अधिक देशांतील ३० हजारांहून अधिक व्यावसायिक काम करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.