Potato Pudhari
पुणे

Ambegaon Potato Prices: बटाट्याचे बाजारभाव घसरले; आंबेगाव तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात

उत्पादनखर्चही निघेना; कांदा वगळता बहुतांश शेतमालाला अपेक्षित दर नाही, हमीभावाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

लोणी-धामणी: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील निरगुडसर, लाखणगाव, पोंदेवाडी, जारकरवाडी आणि लोणी परिसरातील शेतकरी शेतमालाला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने आर्थिक संकटात सापडले आहेत. सध्या बटाट्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरल्याने उत्पादनासाठी केलेला खर्चही वसूल होत नसल्याची शेतकऱ्यांची व्यथा आहे. कांदा वगळता इतर बहुतांश शेतमालाला समाधानकारक दर मिळत नसल्याने शेती करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे.

बटाटा पिकासाठी बियाणे, खते, औषधे, मजुरी, पाणी आणि मशागतीवर मोठा खर्च करावा लागतो. मात्र, बाजारात बटाट्याला मिळणारा दर उत्पादनखर्चाच्या तुलनेत कमी असल्याने शेतकऱ्यांच्या हातात नफा तर दूरच; पण गुंतवलेले भांडवलही परत मिळत नसल्याची परिस्थिती आहे.

त्यामुळे कष्टाने पिकवलेला शेतमाल बाजारात नेल्यानंतर शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडत आहे. दरवर्षी वाढणारा उत्पादनखर्च, मजुरीचे वाढलेले दर, महागडी खते, बियाणे आणि औषधांच्या किमतीमुळे शेतीचे अर्थकारण दिवसेंदिवस बिघडत आहे. त्यातच बाजारभावातील अनिश्चितता शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कांद्याला काही प्रमाणात चांगला बाजारभाव मिळत असला, तरी इतर शेतीमालाला अपेक्षित दर मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

शेतकऱ्यांना उत्पादनखर्चाच्या तुलनेत योग्य मोबदला मिळावा, यासाठी सरकारने हमीभावाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे. केवळ उत्पादन वाढविण्याचे आवाहन करण्याऐवजी उत्पादित शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळवून देण्यासाठी सरकारने ठोस धोरण आखण्याची गरज आहे.

'शेतमाल पिकवण्यासाठी खर्च वाढतोय; मात्र बाजारभाव मिळत नसल्याने शेती परवडत नाही. सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणींकडे गांभीर्याने पाहून हमीभावाची व्यवस्था करावी,' अशी भावना निरगुडसर येथील शेतकरी हनुमंत टाव्हरे आणि वाळुंजनगर येथील शेतकरी बाबाजी टाव्हरे यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT