महाळुंगे पडवळ/पारगाव : आंबेगाव तालुक्याच्या उत्तर भागात कांदा लागवडीला वेग आला असून मजूर टंचाईवर मात करत शेतकऱ्यांनी मशीनद्वारे कांदा लागवड सुरू केली आहे. प्रतिदिवस सुमारे तीन ते पाच एकर ट्रॅक्टर मशीनद्वारे कांदा लागवड पूर्ण होते. त्यासाठी आठ मजूर लागतात. या मशीनसाठी प्रतिएकर 14 हजार रुपये दर आकारला जात असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
मजूर टंचाईमुळे अनेक ठिकाणी कांदा लागवडी मागील वर्षी करता आल्या नव्हत्या. सुमारे 500 ते 1 हजार रुपये प्रतिदिवस महिलांना मजुरी द्यावी लागत होती. यावर उपाय म्हणून मशीनद्वारे कांदा लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. यासाठी जमीन रोटरने सपाट केलेली असावी लागते, कोरड्या जमिनीत देखील कांदा लागवड सहज शक्य होते, असे शेतकर्यांनी सांगितले.
ट्रॅक्टर मशीनच्या मागील बाजूस रोपे ठेवण्यासाठी व मशीनमध्ये प्रत्येकी एक रोप टाकण्यासाठी जागा केलेली आहे. मजुरांच्या साह्याने रोपे मशीनमध्ये पसरवली जातात. मशीनद्वारे कांदा लागवड केल्याने खर्च कमी येतो, श्रम व वेळेची बचत होते तसेच वाफे तयार करावे लागत नाहीत. लागवडीसाठी वाफ्यांना पाणी द्यावे लागत नाही, कांदा रोपांची संख्या देखील कमी लागते, जमिनीच्या सर्व भागात सारखी लागवड होते, क्षेत्र वाया जात नाही, सर्वत्र सारखेच कांदे लागतात, दुभाळके आणि चिंगळी यासारखे कांदे तयार होत नाहीत तसेच जोरदार कांदा पीक येण्यास मदत होते, अशी माहिती मशीन मालक दिनेश ढमढेरे यांनी दिली. तालुक्यात फक्त दोनच मशीन आहेत आणि शेतकऱ्यांची मागणी जास्त आहे.
एका वेळेस अनेक ठिकाणी काम करणे शक्य होत नाही. शेतकऱ्यांनी वाफसा असलेली जमीन कांदा लागवडीसाठी निवडावी व मशीनच्या उपलब्धतेनुसार लागवडीच्या तारखा निश्चित कराव्यात, असेही दिनेश ढमढेरे यांनी सांगितले.
आंबेगाव तालुक्यातील शेतकरी आता शेती व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर करू लागले आहेत. आता कांदा लागवडीसाठीही यंत्राचा वापर वाढताना दिसत आहे. यापूर्वी पारंपरिक पद्धतीने कांदा लागवडी केल्या जात होत्या. आता मात्र, यंत्राद्वारे कांदा लागवड, मल्चिंग पेपरवरदेखील कांदा लागवडी केल्या जातात. विशेष म्हणजे शेतकऱ्यांचे हे प्रयोग यशस्वी होताना दिसत आहेत.
तालुक्यात कांदा लागवड करणाऱ्या मशीनची संख्या कमी आहे. राज्य शासनाकडे कांदा लागवड मशीन अनुदानासाठी विहित नमुन्यात कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव सादर करावा.सिद्धेश ढवळे, तालुका कृषी अधिकारी, आंबेगाव
यंत्राद्वारे कांदा लागवड केल्यास मशागतीचा खर्च वाचतो. यंत्राद्वारेच बेड पाडले जातात. एकरी दोन लाख ते अडीच लाख कांदा रोपे लागतात. रोपांमधील अंतर एकसारखे असल्याने हवा खेळती राहते. कांदे एकसारखे आकाराचे निघतात. उत्पादनात चांगली वाढ मिळते. तसेच कांद्यांची टिकवणक्षमताही जास्त असते. एकंदरीत वेळेची व पैशांची बचत या यंत्राद्वारे होते.सूरज शिवाजी लोखंडे, शेतकरी