पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील चर्चा फिस्कटल्यानंतर अजित पवार गटाकडून सर्व इच्छुक उमेदवारांना तयारीत राहण्याचा निरोप देण्यात आला आहे. अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची तयारी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांच्यात जागा वाटपावरून एकमत न झाल्याने अजित पवार गटाकडून शिवसेना नेते उदय सामंत यांच्याशीही बोलणी सुरू असल्याची चर्चा आहे.
महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, अर्ज भरण्यासाठी केवळ तीन दिवस उरले आहेत. मविआ आणि महायुतीतील चर्चांचा गुंता कायम असून जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मनपा निवडणूक महाविकास आघाडीसोबत लढणार असल्याची चर्चा होती. मात्र, प्रदेश काँग्रेसकडून 'रेड सिग्नल' मिळाल्यानंतर शहर काँग्रेसने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत न जाण्याचा निर्णय घेतला. तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, अजित पवार गटाकडून 'घड्याळ' या निवडणूक चिन्हाबाबत आग्रही भूमिका मांडण्यात आल्याने दोन्ही गटांतील चर्चा फिस्कटली.
यामुळे शनिवारी अजित पवार कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अर्ज भरण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक असताना अधिकृत भूमिकेअभावी इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता आणि संभ्रमाचे वातावरण आहे. अखेर शनिवारी दुपारनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या सर्व ७११ उमेदवारांना तयारीत राहण्याचा निरोप देण्यात आला. अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांच्यात जागा वाटपावरून एकमत न झाल्याने आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील चर्चा फिस्कटल्यानंतर अजित पवार गटाकडून शिवसेना (शिंदे गट) नेते उदय सामंत यांच्याशी प्राथमिक चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही चर्चा प्राथमिक स्वरूपाची असल्याचे सांगितले जात असून, वरिष्ठ नेतृत्वाच्या मंजुरीनंतरच पुढील दिशा ठरण्याची शक्यता आहे.
येत्या २४ तासांत अजित पवार गटाची अधिकृत भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता असून, त्यावरच इच्छुकांचे राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यात शुक्रवारी सकाळी अजित पवार यांच्या जिजाई निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये संभाव्य आघाडीबाबत सविस्तर चर्चा झाली. पुण्यात आघाडी होण्याची शक्यता नाही. मात्र पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी आघाडी करण्याबाबत दोन्ही बाजूंनी सकारात्मक भूमिका व्यक्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आघाडी झाल्यास जागावाटप व निवडणूक चिन्ह यासंदर्भातील अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यावर या बैठकीत एकमत झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे बारामती हॉस्टेलमध्ये ठाण मांडून आहेत. याच ठिकाणी इच्छुकांच्या मुलाखती, पक्षीय बैठका आणि गाठीभेटी सुरू आहेत. मात्र, शनिवारी सकाळी अचानक अजित पवार हे बारामती हॉस्टेलमधून एकटेच बाहेर पडले. विशेष म्हणजे, त्यांच्यासोबत नेहमी असणारा पोलिसांचा फौजफाटा, पायलट कार आणि सुरक्षारक्षकांचा ताफा मात्र हॉस्टेल परिसरातच थांबलेला होता. पवार हे विनापोलिस आणि विनासुरक्षा एकटेच निघून गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.