

पुणे : 'शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारधारेवर चालत असताना निर्णय घ्यायचे असतात. संविधानावर प्रेम करणारा कार्यकर्ता असल्याने गांधी, नेहरूंची विचारधारा असलेल्या काँग्रेसमध्ये जायचे हे ठरविले होते.
पक्षप्रवेश झाल्यानंतर महाविकास आघाडीबाबत चर्चा होत असल्या तरी आता मी काँग्रेसवासी झालो आहे. त्यानंतर, पश्चाताप अथवा चर्चा, विचार न करता काँग्रेस पक्षाच्या नियमाचे पालन करून पुढे जाण्यास प्राधान्य राहील. काँग्रेस हा पक्ष आमिष दाखविणारा अथवा राजकीय अस्तित्व संपविणारा पक्ष नाही', असे मत माजी नगरसेवक प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.
काँग्रेसचे सदस्य म्हणून जगताप यांनी शनिवारी काँग्रेस भवन येथे हजेरी लावली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. काँग्रेस विचारधारेचा अथांग सागर आहे. 135 वर्षांमध्ये हा पक्ष टिकून राहिला. तिकिटाच्या अपेक्षेने आलेला नाही. हा पक्ष आमिष दाखविणारा अथवा राजकीय अस्तित्व संपविणारा पक्ष नाही. एखादा कार्यकर्ता विचारधारेवर चाललेला असतो. त्यावेळी त्याला कोणताच राजकीय पक्ष कोंडीत पकडत नाही. आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. त्या सर्व डावपेचांतून बाहेर पडण्याचे कसब छत्रपतींनी गनिमीकाव्याने शिकविले आहे.
शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना समाधानकारक जागा मिळतील. प्रशांत जगताप हे आमच्या पक्षात आल्याने आमचे बलाबल वाढल्याने बैठकीदरम्यान जागा जास्त मागण्याचा आमचा प्रयत्न असेल. काँग्रेस पक्ष त्यांचा सन्मान करेल आणि योग्य पद्धतीने त्यांचा उपयोग करेल. काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) महाविकास आघाडी म्हणून आम्ही सामोरे जात आहोत, असे स्पष्ट करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर बोलणे शिंदे यांनी टाळले.