

पुणे : आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर, त्याची भावजय लक्ष्मी उदयकांत आंदेकर, तसेच सून सोनाली वनराज आंदेकर यांनी पोलिस बंदोबस्तात शनिवारी (दि. 27) भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले; परंतु संबंधित अर्ज अर्धवट भरले गेले असून, त्यांना पुन्हा अर्ज भरावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिस बंदोबस्तात बंडू आंदेकरला अर्ज भरण्यासाठी पोलिस घेऊन आले होते. यावेळी काळ्या कापडाने आंदेकरचा चेहरा झाकण्यात आला होता, तसेच एका हाताला बांधण्यात आले होते, तरीदेखील एक हात उंचावत बंडू आंदेकरने घोषणाबाजी करत मतदार अर्ज भरण्याचे ठिकाण दणाणून सोडले. 'नेकी का काम, आंदेकर का नाम', 'आंदेकरांना मत, विकासाला मत', वनराजभाऊ आंदेकर जिंदाबाद, मी उमेदवार आहे उमेदवार, दरोडेखोर नाही, अशी घोषणाबाजी यावेळी आंदेकरने केली.
आयुष कोमकर खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर, त्याची भावजय लक्ष्मी उदयकांत आंदेकर, तसेच सून सोनाली वनराज आंदेकर यांना आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास विशेष न्यायालायने सशर्त परवानगी दिली. उमेदवारी अर्ज दाखल करताना मिरवणूक, प्रचारयात्रा, भाषण, घोषणाबाजी करू नयेत, असे आदेश विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी दिले होते. त्यानंतर पोलिसांनी बंडू आंदेकर, त्याची भावजय लक्ष्मी, सून सोनाली यांनी पोलिस बंदोबस्तात शनिवारी दुपारी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले.
बंडू आंदेकर, त्याची भावजय लक्ष्मी, सून सोनाली यांनी आगामी महापालिका निवडणूक लढविण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. पक्षादेशानुसार उमेदवारी अर्ज दाखल करायचे असून, त्यासाठी सशुल्क पोलिस बंदोबस्त देण्यात यावा, असा अर्ज आंदेकर यांच्या वतीने ॲड. मिथुन चव्हाण यांनी न्यायालयात केला होता. 'निवडणूक लढविणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे,' असे नमूद करून विशेष न्यायालयाने आरोपींना पोलिस बंदोबस्तात अर्ज दाखल करण्यास परवानगी दिली. त्यानुसार संबंधित उमेदवारांनी अर्ज भरले, परंतु संबंधित अर्ज अर्धवट राहिले आहेत. त्यामुळे संबंधितांना पुन्हा एकदा अर्ज भरावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बंडू आंदेकर, लक्ष्मी उदयकांत आंदेकर, तसेच सोनाली वनराज आंदेकर हे आज पोलिस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. मात्र, त्यांचा उमेदवारी अर्ज हा अर्धवट भरलेला होता. त्यामुळे त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही. अर्ज भरण्यासाठी आणखी तीन दिवसांची मुदत असून, या कालावधीत ते पुन्हा अर्ज भरू शकतात.
कल्याण पांढरे, निवडणूक निर्णय अधिकारी, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय