पुणे

तब्बल 50 वर्षांनंतर पुण्यात होणार ‘टीपी स्किम’

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुण्यात तब्बल 50 वर्षांनंतर आता उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथे दोन नगररचना योजना (टाऊन प्लॅनिंग स्किम) होणार आहेत. या दोन्ही योजनांच्या प्रारूप आराखड्यास महापालिकेच्या मुख्य सभेत गुरुवारी मंजुरी देण्यात आली. उरुळी येथील आणखी एका टीपी स्किमच्या गट बदलाच्या प्रस्तावासही यावेळी मंजुरी देण्यात आली.

महापालिका हद्दीत ऑक्टोबर 2017 मध्ये समाविष्ट झालेल्या उरुळी देवाची व फुरसुंगी या गावांमध्ये प्रस्तावित रिंगरोडलगत पीएमआरडीएने तीन टीपी स्किमचा प्रस्ताव तयार केला होता. त्यात फुरसुंगीत दोन तर उरुळी देवाची येथे एक टीपी स्किमचा समावेश होता. दरम्यान ही गावे पालिकेत आल्यानंतर मार्च 2011 मध्ये पालिकेने या टीपी स्किमचे काम हाती घेतले होते. त्यासाठी तज्ज्ञ सल्लागार नेमून आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यात फुरसुंगी येथील एका टीपी स्किममधील जागेसंदर्भात वाद झाल्याने हा तेथील जागेचा गट बदलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महापालिकेने उरुळी देवाची येथील 109.78 हेक्टर व फुरसुंगी येथील 260. 67 हेक्टर क्षेत्राच्या दोन टीपी स्किमचा प्रारूप आराखडा मुख्यसभेच्या मंजुरीसाठी ठेवला होता.

अशी असेल 'टीपी'ची पुढील प्रक्रिया

महापालिकेच्या मंजुरीनंतर दोन्ही प्रारूप टीपी स्किमच्या आराखड्यावर हरकती-सूचनांची कार्यवाही होईल. त्यानंतर तीन महिन्यांच्या कालावधीत पुन्हा मुख्यसभेची मंजुरी घेऊन हा आराखडा नगरविकास विभागाकडे जाईल. नगरविकासची मंजुरी मिळाल्यानंतर आरबीटेटर नेमला जाईल. त्यानंतर रस्ते, पाणी, कचरा यासारख्या आरक्षणांच्या जागा साधारणपणे दिवाळीपर्यंत महापालिकेच्या ताब्यात येण्यास सुरुवात होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पुण्यात आतापर्यंत 7 'टीपी स्किम'

शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी टीपी स्किम योजना राबविल्या जातात. पुण्यात न. ता. वाडीची पहिली टीपी स्किम योजना 1922 रोजी राबविली गेली. त्यानंतर 1930 ला सोमवार- मंगळवार पेठ व विद्यापीठ रस्ता-शास्त्रीनगर, 1932 ला राजाराम पूल ते सॅलिसबरी पार्क, 1960 ला येरवडा आणि सहावी म्हणजेच शेवटची टीपी 1970 ला हडपसर इंडस्ट्रियल एरिया येथे राबविली.

ज्या भागात टीपी स्कीम होते, त्या भागाचा सर्वांगीण विकास होत असतो. कोणत्याही नागरिकांवर अन्याय होत नाही. त्यामुळे फुरसुंगी, उरुळी देवाची या भागात टीपी स्कीम करण्यास मुख्य सभेत मंजुरी देण्यात आली. नागरिकांना सुलभ आणि सर्वसमावेशक आरक्षणे मिळावी, असे धोरण भाजपचे होते, त्यानुसार हा प्रस्ताव मंजूर केला.
                                                                       – गणेश बिडकर, सभागृह नेता.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT