पुणे : पुढारी वृत्तसेवा
जिद्द, चिकाटी आणि ध्येय यांची सांगड घालत एका 80 वर्षीय एका तरुणाने सिंहगड किल्ला तब्बल 1500 वेळा सर करण्याचा विक्रम केला आहे. हा पराक्रम करणाऱ्या विकास करवंदे यांचा सिंहगडावरील पुणे दरवाजाजवळ शाल, श्रीफळ आणि मानाची पुणेरी पगडी घालून सिंहगड परिवारातर्फे जुगल किशोर राठी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सुनीता नाडगीर, हेमलता राव, श्यामला जोशी, देविदास चव्हाण आदी सिंहगडप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सत्कार समारंभाचे नियोजन प्रकाश व आशा केदारी या दाम्पत्याने केले होते.
विकास करवंदे यांनी वयाच्या 53 व्या वर्षी सिंहगड पायी चढण्यास प्रारंभ केला आणि बघता बघता गेल्या 28 वर्षांत त्यांनी 1500 वेळा सिंहगड चढण्याचा विक्रम करून नव्या पिढीपुढे एक आदर्श ठेवला आहे. विशेष म्हणजे गेली अनेक वर्षे ते दर रविवारी आणि गुरुवारी सिंहगड पायी चढत असून पाऊस किंवा थंडीमुळे त्यात आजतागायत कधीच खंड पडला नाही.
नियमीतपणे सिंहगड वारी करीत असताना पहाटे पुण्यातून गडाकडे जाण्यासाठी बस नव्हती. आपल्यासारखीच इतरांची अडचण ओळखून करवंदे यांनी पहाटे पाच वाजता बस सुरू करण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे काही वर्षांपूर्वी दर रविवारी डेक्कन ते सिंहगड ही बस पहाटे पाच वाजता सुरू झाली.
पतीच्या विक्रमाने प्रभावित होऊन पत्नी आशा करवंदे यांनी आपणही जमेल तेवढा गड चढायचा निश्चय केला. विशेष म्हणजे घरची जबाबदारी, पायाचे ऑपरेशन झालेले असूनही त्यांनी सिंहगडवर नियमित जाण्याचा निर्धार केला. प्रारंभी 4 पायर्या सहज चढ-उतार न करू शकणार्या आशा यांनी सिंहगड पूर्णपणे चढून जाण्याचा संकल्प मनी धरून तो पूर्ण केला. त्यांनी दर आठवड्याला चिकाटी व जिद्दीने टप्प्याटप्प्याने अंतर व उंची वाढवत नियमित सराव करत काही दिवसांपूर्वी पुणे दरवाजाचा अंतिम टप्पा यशस्वीपणे पार केला. त्यांना जुगल राठी, सुरेश भोर, अरविंद व स्नेहल जगदाळे आणि सिंहगड परिवारातील सदस्यांनी सहकार्य केले.