नाना पटोले : आगामी निवडणुकीत भाजप हाच आमचा मुख्य शत्रू असेल | पुढारी

नाना पटोले : आगामी निवडणुकीत भाजप हाच आमचा मुख्य शत्रू असेल

इगतपुरी/घोटी : पुढारी वृत्तसेवा : आगामी महापालिकेच्या निवणुकीत आमचे काँग्रेस चांगली कामगिरी करेल तसेच भाजप व शिवसेनेची गेली अनेक वर्षे मुंबई महापालिकेवर सत्ता राहिली आहे. मात्र, येत्या निवडणुकीत भाजप हा आमचा मुख्य शत्रू राहणार आहे. त्या पद्धतीने आमची भूमिका स्पष्ट राहणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

इगतपुरीतील बलायदुरी येथील रेनफॉरेस्ट येथे तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुंबई काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिराची सांगता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाने झाली. या वेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, आमदार हिरामण खोसकर, ज्येष्ठ नेते संदीप गुळवे, तालुकाध्यक्ष रमेश जाधव, माजी पंचायत समिती सभापती गोपाळ लहांगे आदी उपस्थित होते.

मोदी सरकारने जनतेचे मूळ मुद्दे बाजूला सारल्याने देशात बेरोजगारांची संख्या वाढली असून, देशाची ओळख ही बेरोजगारांचा देश अशी झाली आहे. काँग्रेसच्या शिलेदारांनी 2024 ला केंद्रात सत्ता परिवर्तनासाठी सज्ज व्हावे. बावनकुळेंच्या आरोपांचा समाचार घेत नाना पटोले म्हणाले की, गावगुंडांना गावगुंडच दिसणार आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेतकर्‍यांची वीज कापल्याशिवाय पर्याय नाही, असे बोलले असता, यावर भाजपने टीका केली. यावर भाजपवर टीका करताना टोला लगावत ते म्हणाले की, 2007 पासून भाजपने केलेले पाप असून, ते आता आमच्या शेतकर्‍यांच्या उरावर पडत असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

महाराष्ट्राची ओळख बाळासाहेब ठाकरेंमुळे
महाराष्ट्राची ओळख ही बाळासाहेब ठाकरेंमुळे झाली आहे म्हणून मी त्यांच्या प्रत्येक जयंतीदिनी अभिवादन करतो. राजकारण हे परिवर्तनवादी असते. बाळासाहबांना धोकेबाज लोक कधीच आवडत नव्हते आणि ज्यांनी त्यांच्याशी धोका केला, ते त्यांना जवळही उभे करत नव्हते, असे पटोले म्हणाले.

चालू वीजबिले भरावीत
गेली अनेक वर्षे महाराष्ट्र वीज वापरामध्ये अग्रेसर राहिला आहे. भाजपच्या काळात जे नुकसान झाले, त्याचे परिणाम आमचा शेतकरी वर्ग भोगतोय. मात्र, दोन दिवसांपूर्वी विधानसभेत या विषयी चर्चा झाली असून फक्त चालू बिले भरले, तरी आपले कनेक्शन कायम सुरू ठेवण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती पटोले यांनी दिली.

हे ही वाचा :

Back to top button