Marigold farming: झेंडू फुलांनी वाड्यातील गातेस खुर्द गावाला बनविले समृद्ध  Pudhari
पालघर

Marigold farming: झेंडू फुलांनी वाड्यातील गातेस खुर्द गावाला बनविले समृद्ध

हरभरा लागवडीत अग्रेसर गाव फुलशेतीकडे वळले

पुढारी वृत्तसेवा

वाडा : मच्छिंद्र आगिवले

सणासुदी अथवा पूजाविधी दरम्यान झेंडूच्या फुलांना विशेष महत्व असून मांगल्याचे प्रतीक म्हणून या फुलांकडे बघितले जाते. वाडा तालुक्यातील गातेस खुर्द गावाला मात्र याच झेंडूच्या फुलांनी समृद्ध बनविले असून येथील शेतकऱ्यांची मेहनत व चिकाटीच्या जोरावर गावाला नवी ओळख मिळाली आहे. गातेस गावातील एका उच्चशिक्षित तरुणाने मागील 20 वर्षांपासून शेतीत आपले नाव कोरले असून सध्या या शेतकऱ्याच्या 25 एकर क्षेत्रावर झेंडूची लाल- पिवळी चादर पसरली आहे.

दिपक शंकर पाटील हा तरुण बीएससी केमिस्ट पदवीधर असून नोकरी करून गुलामगिरी करण्यापेक्षा स्वतःच्या शेतात कष्ट करण्याचा त्याने निर्णय घेतला. औषधे, वातावरण, बाजारभाव या गोष्टींचा सखोल अभ्यास करून त्याने झेंडू फुलांची लागवड करण्याचा निर्णय घेत जवळपास 20 वर्षांपासून आपल्या शेतात झेंडू फुलवितो. स्वतःच्या जागेसह भाडेतत्वावर जागा घेऊन सध्या 25 एकर जागेत त्याने 2 लाख रोपांची झेंडू लावगड केली आहे. कलकत्ता, अंबर यांसारख्या जातीची फुले टिकवू असल्याने बाजारात त्यांना मागणी असते हे दीपक याने ओळखून अत्याधुनिक पद्धतीने त्याने लागवड केली आहे. 2 लाख रोपांसाठी दीपक याला जवळपास 20 लाखांचा खर्च आला आहे.

सध्या उत्पन्न जोमाने सुरू असून एप्रिल महिन्यापर्यंत हे उत्पन्न सुरू राहील असा अंदाज आहे. सध्या बाजारात 50 रुपये प्रतिकिलो भाव असून खर्च वगळता भाव स्थिर राहिला तर दिपक याला तब्बल 20 लाखांचा नफा अपेक्षित आहे. दलालांच्या भरवशावर न राहता स्वतः दादर, कल्याण, विरार, नालासोपारा, सुरत, अहमदाबाद अशा ठिकाणी माल पोहोचवण्याची कला दीपक याच्याकडे असल्याने नफ्यात वाटेकरी होत नाही. सध्या तब्बल 6 हजार किलो झेंडूचे उत्पन्न दीपक यांना मिळत असून 5 दिवसांनी फुलांची तोडणी केली जाते.

मजुरांचा प्रश्न गंभीर असल्याने अनेक शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो मात्र दीपक यांच्याकडे जवळपास 35 मजूर काम करतात. यांत्रिकीकरणाचा योग्य अभ्यास व अत्याधुनिक शेतीचे तंत्र अवगत असल्याने दीपक यांना मजुरांची गरज फक्त तोडणीसाठी सर्वाधिक लागते.

काय आहेत समस्या

बाजारभाव गडगडने हा शेतकऱ्याच्या समोरील मुख्य धोका असून एखाद्या लहान बालकाप्रमाणे झाडाचे संगोपन करण्याचे तंत्र आत्मसाद करायला लागते. औषधांची सखोल माहिती गरजेची असून अवकाळी पाऊस व आभाळ भरणे हे फुल झाडांसाठी सर्वाधिक घातक असते. सेंद्रिय व रासायनिक खतांचे योग्य प्रमाण असायला हवे शिवाय अन्य शेतकऱ्यांशी संपर्क व संबंध अधिक फायदेशीर ठरतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT