

पालघर : 2019 मध्ये महायुतीचे सरकार आले त्यामध्ये स्वर्गीय अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अनेकदा पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर ते आल्याचे दिसून आले. तर डहाणू या ठिकाणी त्यांनी प्रशासनाची आढावा बैठक देखील घेतली होती. माजी आमदार सुनील भुसारा यांच्यासोबत अजित पवार यांचे खूप जवळचे संबंध होते. यामुळे सुनील भुसारा यांनी नवीन वास्तू बांधल्यानंतर त्याच्या पूजेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार 28 नोव्हेंबर 2022 मध्ये मोखाड्यातील त्यांच्या निवासस्थानी आले होते.
तीच अजित पवार यांची पालघर जिल्ह्यातील शेवटची भेट ठरली. माजी आमदार भुसारा यांचे आणि अजित पवार यांचे सौख्य राज्यभर परिचित होते. मात्र जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विभागणी झाली तेव्हा भुसारा हे शरद पवारांसोबत राहिले मात्र यानंतर सुद्धा अजितदादांची आणि त्यांची मैत्री कायम राहिली मात्र भुसारा हे प्रत्येक वेळी मैत्रीपेक्षा अजित पवार मला मुलांसारखे मानतात असे अनेकदा त्यांच्या भाषणातून देखील त्यांनी सांगितले ते दिसून येते.
पालघर जिल्ह्यातील सध्याचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अनेकदा दादांची मंत्रालयात त्यांच्या बंगल्यावर भेट घेतली. यावेळी जिल्ह्याच्या विकासासाठी अनेकदा दादांनी त्यांची विचारपूस करून पालघर जिल्हा आणि त्यांचं नातं अनेकदा त्यांच्या कृतीतून दाखवून दिले. या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात अनेक तालुक्यात व्यापारी बांधवांनी बाजारपेठ बंद केल्याचे देखील दिसून आले तर जिल्ह्यातील सर्वपक्षीयांकडून श्रद्धांजली देखील वाहण्यात आली.
मी कोणत्या पक्षात होतो, यापेक्षा मी दादांच्या घरातील एक सदस्य होतो. मी पक्षफुटीनंतर दादांबरोबर गेलो नाही. तरीसुद्धा अगदी एका रिंगवर दादा माझे फोन उचलत होते. आणि बोल सुनील! असा त्यांच्या मुलाइतकाच अधिकारवानी माझ्यावर कधी कधी रागवत देखील असत. दादांच्या जाण्याने राज्याचे नुकसान तर झालेले आहे. मात्र माझा पाठीराखा वैयक्तिकरित्या माझ्यावर प्रेम करणारा दादा हरपल्याची दुःख अतोनात आहे. माझ्या वडिलांचे निधन 2012 मध्ये झाले मी त्यांना देखील दादाच सांगत असायचो. यानंतर खरंतर ही पोकळी अजित दादांमुळे भरून निघाली होती. मात्र पुन्हा एकदा पोरके झाल्याची भावना माझ्यामध्ये निर्माण झाली आहे.
सुनील चंद्रकांत भुसारा, माजी आमदार, विक्रमगड विधानसभा