

पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मेंढवण खिंड अनेक वर्षांपासून अपघातांचे केंद्रबिंदू ठरली आहे. नागमोडी वळणे, तीव्र उतार, अरुंद रस्ता आणि अपुरी सुरक्षात्मक व्यवस्थेमुळे खिंडीत अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत.परंतु अपघातप्रवण क्षेत्रात अपघात कमी करण्याऐवजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने थेट वाहनांच्या वेगमर्यादेत वाढ करून कहर केला आहे.मेंढवण खिंडीतील अपघात रोखण्यासाठी वेग मर्यादा कमी करण्याची मागणी जोर धरत आहे.
मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील मनोर गेट हॉटेल ते मेंढवण गावापर्यंतचा घाट रस्ता ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखला जातो. वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे ट्रक चालक, खासगी वाहनचालक तसेच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण असते.नागमोडी वळण असलेल्या रस्त्यावर अपघात रोखण्यासाठी वेगमर्यादा कमी केली जाते;परंतु मेंढवण खिंडीत चारचाकी व हलक्या वाहनांसाठी शंभर किलोमीटर प्रतितास आणि अवजड वाहनांसाठी 80 किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा निश्चित करण्यात आल्याने महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. व्हाईट टॉपिंगच्या कामामुळे रस्त्याची अवस्था पाहता मेंढवण खिंडीत निश्चित केलेला वेग धोकादायक ठरणार आहे. रस्त्यावरील नागमोडी वळणे असलेल्या भागात रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य आणि धोक्याचा इशारा देणारे फलकांचा अभाव आहे. अशा परिस्थितीत वेग वाढवणारे फलक लावणे म्हणजे अपघातांना आमंत्रण देण्यासारखे असल्याची भावना वाहन चालकांकडून व्यक्त केली जात आहे.
अपघात टाळण्यासाठी पथदिवे, रिफ्लेक्टर, स्पीड ब्रेकर, इशारा फलक, तसेच वाहतूक पोलिसांचे नियमित गस्त पथक आवश्यक असताना दुर्लक्ष होत असल्याचा वाहन चालक करत आहेत.वेगमर्यादेचे फलक लावून महामार्ग सुरक्षित होत नसल्याचा विसर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाला पडला आहे.
“मेंढवण खिंडीत वेगमर्यादा वाढवणे म्हणजे वाहनचालकांना वेगाने वाहन चालवण्यास प्रवृत्त करणे आहे.वाढलेल्या वेगामुळे खिंडीत अपघातांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वेग मर्यादा वाढवण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, मेंढवण खिंडीत वेगमर्यादा कमी करून सुरक्षेच्या उपाययोजना राबवण्याची मागणी स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि वाहनचालकांकडून केली जात आहे.