

खानिवडे : किल्ले वसई परिवार प्रतिनिधींच्या पुढाकाराने जंजिरे वसई किल्ल्यात दुर्गमित्रांनी श्रमदान करून पेशवेकालीन सती वृंदावन गर्द झाडीतून मोकळे केले. चार तासांच्या श्रमदानात दुर्गमित्रांनी सती वृंदावन मुख्य स्थळ, परिसर गर्द झाडीतून मोकळा केला. गेली काही वर्ष पेशवेकालीन सती वृंदावनाची कोणत्याही प्रकारची स्वच्छता न झाल्याने हा संपूर्ण परिसर गर्द अनावश्यक झाडीच्या झाडोऱ्याखाली बंदिस्त झाला होता.
किल्ले वसई मोहिमेचे प्रतिनिधी गेले अनेक वर्ष या परिसराची स्वच्छता करत आहेत, मात्र गेल्या काही वर्षात या परिसराकडे येणाऱ्या वाटा गच्च झाडीमध्ये बंदिस्त झाल्याने येथे पोहोचणे अतिशय कठीण होऊन बसले आहे. या वृंदावनावर उगवलेली काटेरी झुडपे काढताना दुर्गमित्रांना बरेच कष्ट करावे लागले.
विशेषता हे सती वृंदावन मातीच्या ढिगाऱ्या खाली बंदिस्त होत असल्याने याचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक होते. दुर्गमित्रांनी हे संवर्धन काटे, कीटक, मच्छर यांचा सामना करत केले. श्रमदानाची सुरुवात संवर्धनाचे साहित्य पूजन करून करण्यात आले. वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण घाडीगांवकर यांच्या सहकार्याने दुर्गमित्रांना संवर्धनाचे नवीन साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचा वापर करून दुर्गमित्रांनी वृंदावनाच्या भोवतालचा परिसर देखील स्वच्छ केला.
या मोहिमेत वृंदावनाच्या बाजूस ढिगाऱ्यात पडलेली मातीची कवले आढळून आली. यावरून या सती वृंदावनाला जुन्या पद्धतीची समाधी छत्री असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. लवकरच हा मातीचा ढिगारा अधिक मोकळा केल्यानंतर या वृंदावनाच्या समोर असलेले एक लहानसे कुंड, वृंदावनाभोवती इतर पडलेले दगड यांचे संवर्धन इत्यादी सर्व कामे पूर्ण करण्यात येतील. या संवर्धन मोहिमेत केंद्रीय पुरातत्व विभाग वसई मंडल याचे कर्मचारी सुनील कदम यांनी दुर्गमित्रांना सक्रिय मदत करून सहकार्य केले. त्यांनी स्वतः देखील मोहिमेत सहभाग नोंदवला.
केंद्रीय पुरातत्व विभाग वसई मंडल यांनी दिलेल्या सहकार्याचे इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी आभार मानले. काटेरी झुडपांची स्वच्छता करताना विशिष्ट पद्धतीची लाकडी बेचकी तयार करण्यासाठी सुनील कदम यांनी दुर्गमित्रांना मार्गदर्शन केले. यामुळे काटेरी गच्च झाडी स्वच्छ करताना अतिशय मोलाची मदत झाली. सकाळी 8 ते 12 या चार तास झालेल्या स्वच्छता मोहिमेत एकूण चार दुर्गमित्रांनी सती वृंदावनाला मोकळा श्वास प्राप्त करून दिला.
याच महिन्यातील पुढील संवर्धन मोहिमेत दुर्गमित्र वृंदावना भोवतालची अनावश्यक माती मोकळी करून वृंदावनाचे निश्चित स्वरूप, मोजमापे, नोंदणीकरण तपशील इत्यादी उपक्रम पूर्ण करणार असे दुर्गमित्रांनी सांगितले आहे.याचबरोबर वसई किल्ल्यातील दुर्लक्षित व नामशेष होणाऱ्या स्थळांच्या संवर्धनासाठी सर्वतोपरी श्रमदान करण्यात येईल. या मोहिमेत जास्तीत जास्त तरुणांनी सहभाग नोंदवणे हे काळाची गरज आहे. केंद्रीय पुरातत्व विभाग वसई मंडळ अंतर्गत करण्यात आलेले सहकार्य अतिशय मोलाचे सहकार्य लाभल्याचे देखील सांगण्यात आले आहे.