Vasai Dry Fish Market Pudhari
पालघर

Vasai Dry Fish Market: वसई तालुक्यात सुक्या मासळीला मोठी मागणी; आठवडे बाजारात खवय्यांची गर्दी

हिवाळ्यात सुकवलेली दर्जेदार सुकी मच्छी महाग असूनही आदिवासी, शेतकरी व मजूर वर्गाची पसंती कायम

पुढारी वृत्तसेवा

खानिवडे : जेवताना दोन घास अधिक जाण्यासाठी खरपूस भाजून तोंडी लावण्याचा प्रकार व गरिबांच्या जेवणातील चविष्ट भाजीचा प्रकार म्हणून वर्षभर साठवणूक करून वापरण्यात येणाऱ्या सुक्या मासळीची वसई तालुक्याच्या आठवडे बाजारात सद्ध्या मोठी आवक होत आहे. येथील आठवडे बाजारात वसई, अर्नाळा येथील मच्छीमार मोठ्या प्रमाणात सुकी मच्छी विक्रीसाठी घेऊन येत आहेत . यामध्ये हिवाळ्यात सुकवलेल्या सुक्या मच्छीचा दर्जा चांगला असल्याचे सांगितले जात असल्याने बाजारात खवय्यांच्या पसंतीस ही मच्छी उतरत आहे.

जास्त प्रमाणात आदिवासी व शेतकरी यांच्या कडून सुक्या मच्छीला मोठी मागणी असून कामकाजानिमित्त येथे स्थलांतरित झालेला मजूर वर्गही सुक्या मच्छीचा खवय्या आहे . त्यात हिवाळ्यात सुकवलेल्या मच्छीचा दर्जा हा खूपच चांगला असतो . मांदेली, बोंबील, सुकट, जवळा, वाकटी, पाखट, बांगडा, घोळीचा खारा,आदी मासळी बाजारात आली आहे . मात्र दरसाल वाढणाऱ्या महागाईचा फटका मासळी खरेदीदारांना बसत असून मागील वर्षी दीडशे ते तीनशेने घेतलेल्या बोंबिलांसाठी तीनशे ते पाचशे रुपये शेकडा मोजावे लागत आहेत . तसेच इतर सुक्या मच्छीचा भाव हा मागील वर्षीच्या तुलनेत 15 ते 25 % वाढला आहे.

मात्र तरीही कामकाजाच्या दिवसांत जेवणासाठी घरात साठवणूक असलेली कमी मेहनतीची व चविष्ठ भाजीचा एक प्रकार असल्याने आताच्या दिवसात सुकी मच्छी खरेदी करून ठेवावी लागत असल्याचे खरेदीदार सांगत आहेत. जी अजून काही प्रक्रिया करून साठवून ठेवून वर्षभर वापरता येते. मात्र दर्यात मासेमारी करताना लागणारे डिझल, मजूर व इतर बाबींचा होणारा वापर आणि दर्या सागरात त्यामानाने मिळणाऱ्या मासळीच्या प्रमाणात तफावत झाल्याने मासळी महाग झाल्याचे कोळी विक्रेत्या सांगत आहेत. सध्या येथील आठवडे बाजारात सुकी मच्छी मोठ्या प्रमाणात विक्रीकरिता आलेली दिसत आहे.

वसईच्या पूर्व ग्रामीण भागात खानिवडे सोमवार, मांडवी गुरुवार, शिरवली रविवार, सातीवली शनिवार, चिंबिपाडा बुधवार, वज्रेश्वरी बुधवार तर वसई पश्चिमेतील पापडी शुक्रवार, विरार टेम्भीपाडा सोमवार आदी आठवडे बाजारात सुकी मच्छी मोठया प्रमाणात आली आहे. हिवाळ्यात सुकवलेल्या सुक्या मच्छीचा दर्जा हा उत्तम प्रतीचा असल्याने हिवाळा संपताना साधारण फेब्रुवारी मार्च मध्ये जास्त प्रमाणात खरेदी केली जाते. हिरव्या भाजीसह अन्न धान्यात भेसळ होणे, जास्त रासायनिक खते औषधांचा वापर होणे , हे आरोग्यासाठी अपायकारक आहे. मात्र काही भेसळमुक्त आहरांपैकी सुकी मच्छी ही असून केवळ सुकवून खारवलेली असते. त्यामुळे एक चांगलेअन्न म्हणून सुक्या मच्छीला जास्त पसंद केले जाते.

सद्ध्या वसईच्या ग्रामीण भागात स्वतः कोळीनी गावागावात दारावर सुकी मच्छी विक्रीसाठी आणत आहेत. त्या मच्छीची घासाघीस करून गृहिणी खरेदी करतात.व मच्छी स्वच्छ करून आताच्या उन्हात पुन्हा दोन तीन उन्ह देऊन चांगली वाळवून साठवणूक करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT