Dahanu Tribal Students Festival: डहाणूत आदिवासी विद्यार्थ्यांचा कला, विज्ञान व क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न
डहाणू : डहाणू येथील पारनाका मैदानावर जागर युवा संस्कृतीचा 2026 या उपक्रमांतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी कला, विज्ञान आणि क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू कार्यालयाच्या वतीने हा महोत्सव 31 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 या कालावधीत मोठ्या उत्साहात पार पडला. या महोत्सवात डहाणू प्रकल्पातील 34 शासकीय आश्रमशाळा, 21 अनुदानित आश्रमशाळा आणि 17 शासकीय आदिवासी वस्तीगृहांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महोत्सवात विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शन, हस्तकला प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शनात 55 आश्रमशाळांनी सहभाग घेत ऊर्जा, पर्यावरण, पाणी व्यवस्थापन, आरोग्य आणि तंत्रज्ञान या विषयांवरील प्रकल्प सादर केले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे सर्वत्र कौतुक झाले. रांगोळी स्पर्धेत विद्यार्थिनींनी सुंदर व आकर्षक रांगोळ्या काढून आपली कला दाखवली. हस्तकला प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंमधून आदिवासी कला व
संस्कृतीचे दर्शन घडले. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये लोकनृत्ये आणि सामाजिक विषयांवरील नृत्याविष्कार सादर करण्यात आले. पाण्याचे महत्त्व सांगणाऱ्या लहान विद्यार्थ्यांच्या नृत्याने उपस्थितांची विशेष दाद मिळवली. वस्तीगृहांतील विद्यार्थ्यांसाठी हॉलीबॉल, कबड्डी आणि खो-खो स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा उत्साहात पार पडल्या. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सांगून विद्यार्थ्यांना शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि करिअरविषयी मार्गदर्शन केले.
तसेच प्रश्नमंजुषा, चित्रकला, निबंध आणि वेशभूषा स्पर्धाही घेण्यात आल्या. विविध स्पर्धांतील विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी 1100 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 700 रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी 500 रुपये रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. हा संपूर्ण उपक्रम सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विशाल खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. बी. एम. पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी केले.
या महोत्सवामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा आणि वैज्ञानिक क्षमतेला नवी चालना मिळाल्याची भावना उपस्थित मान्यवर, शिक्षक आणि पालकांनी व्यक्त केली.

