

पालघर : मनोर पालघर महामार्गावर भरधाव वेगामुळे झालेल्या अपघातात एक टेम्पो रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळल्याची घटना घडली. या अपघातात टेम्पो चालक जखमी झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पालघर सिन्नर महामार्गावरील गोवाडे गावाच्या हद्दीत संध्याकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. टेम्पो मनोर येथून पालघरच्या दिशेने जात होता. गोवाडा गावाजवळ महामार्गावरून भरधाव वेगात जात असताना अचानक वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. परिणामी टेम्पो रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीत कोसळला. या अपघातात टेम्पो चालक मनोज मेवालाल चौधरी (34) यांना दुखापत झाली असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. विहिरीत पडलेल्या वाहनामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने अपघाताच्या वेळी वाहनात चालकाव्यतिरिक्त कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र टेम्पोचे नुकसान झाले आहे. या मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे चिंता व्यक्त केली जात असून संबंधित यंत्रणांनी वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.