उत्तर महाराष्ट्र

नाशिक : जि. प. अभियंता लाच घेताना जाळ्यात

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ठेकेदाराकडून दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील शाखा अभियंता अमोल खंडेराव घुगे (43) यास रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सायंकाळी 6.30च्या सुमारास झालेल्या कारवाईमुळे जिल्हा परिषदेत एकच धावपळ उडाली होती. दरम्यान, गेल्या ऑगस्टमध्ये आठ लाख रुपयांची लाच वाहनचालकामार्फत स्वीकारल्याप्रकरणी तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांना अटक केली होती. आता दुसर्‍यांदा जिल्हा परिषदेत लाच प्रकरण समोर आल्याने एकच चर्चा रंगली आहे.

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे सध्या मिशन जलजीवन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांची कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत. त्यामुळे तेथे ठेकेदारांची मोठ्या प्रमाणावर सतत गर्दी असते. सिन्नर तालुक्यातील एका ठेकेदाराने काम पूर्ण केल्यानंतर त्याचे देयक तयार करण्याच्या बदल्यात शाखा अभियंता अमोल घुगे याने ठेकेदाराकडे एक लाख 90 हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोड म्हणून दीड लाखावर बोलणी झाली होती. मात्र, ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्याने, हा संपूर्ण व्यवहार उघड झाला आहे. दरम्यान, ठेकेदाराच्या तक्रारीनंतर शुक्रवारी (दि.3) सायंकाळी 6. 30 च्या दरम्यान ठेकेदाराकडून दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना घुगे यास रंगेहाथ पकडण्यात आले. तक्रारदार हा शासकीय स्थापत्य कंत्राटदार असून, त्याने सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे नळपाणी पुरवठ्याचे काम नियमानुसार पूर्ण केले आहे.

या कामाचे 48 लाख रुपयांचे देयक (बिल) तयार करून ते मंजूर करून देण्यासाठी अमोल घुगे हा संबंधित ठेकेदारावर दबाव टाकत असे. एकूण रकमेच्या 4 टक्क्यांनुसार एक लाख 90 हजारांची त्याच्याकडून सातत्याने मागणी होत होती. अखेर तडजोड म्हणून तीन टक्क्यांनुसार एक लाख 50 हजार रुपयांची बोलणी झाली. ठेकेदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्याने घुगे याचा भंडाफोड झाला. त्याला दीड लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT