उत्तर महाराष्ट्र

सहा महिला, चार दिवस अन् साडे चारशे किमी अंतर..,महिला सबलीकरणासाठी इतकं सारं

गणेश सोनवणे

 नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा : नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनच्या सहा महिलांनी अवघ्या चार दिवसांत तब्बल साडे चारशे किमी अंतर सायकलवर पूर्ण करीत सहा देवी मंदिरांना भेटी देत महिला सबलीकरणाचा जागर केला. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक सायकलिस्टस फाऊंडेशनच्या महिलांनी महिलांसाठी "महिला सबलीकरण सायकल मोहीम" दि. 26 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान आयोजित केली होती.

महिला ही देवीचे रूप मानले जाते, या अनुषंगाने या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यात डॉ. मनिषा रौंदळ, माधुरी गडाख, रोहिणी भामरे, अनुराधा नडे, पुष्पा सिंग, प्रियंका देशमुख या सहा सायकलिस्टस महिलांनी सहभाग नोंदविला.

नाशिक सायकलिस्टस फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही आगळी वेगळी मोहीम राबविण्यात आली. तत्पूर्वी दि. 25 फेब्रुवारी रोजी गोल्फ क्लब मैदान येथे जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक व क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत "महिला सबलीकरण" या विषयावर प्रबोधनात्मक पथनाट्य या सहा सायकलिस्टस महिलांनी सादर केले. दि. 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता सांडव्यावरची देवी, गंगा घाट येथून या मोहिमेस प्रारंभ झाला. जुन्या पारंपारिक रूढींना बाजूला ठेवून नाशिक सायकलिस्टस फाऊंडेशनच्या पुरुष सायकलिस्टनी या सर्व महिलांचे औक्षण केले व एक नवीन पायंडा सुरू केला. आंतरराष्ट्रीय खेळाडू ऋतू भामरे हिने रॅलीस हिरवा झेंडा दाखविल्यानंतर जय मातादीच्या जयघोषात राईडला सुरुवात झाली.

या मोहीमेअंतर्गत मार्गात ठिकठिकाणी शाळेंमध्ये व गावा-गावांत 'महिला सबलीकरण' या विषयावर प्रबोधनात्मक पथनाट्य सादर करत स्त्री-पुरुष समानतेचा, महिला सबलीकरणाचा संदेश देण्यात आला. सर्वांच्या सायकलींना 'महिला सबलीकरण' या विषयी संदेश देणारे फलक लावण्यात आलेले होते. त्यांच्या टी-शर्टवरदेखील 'वुमन्स इम्पॉररमेंट' चा उल्लेख करण्यात आला होता. एकाच रंगाच्या गुलाबी टी-शर्ट मध्ये शिस्तबद्ध चालणारी ही राईड सर्व मार्गात लक्ष वेधून घेणारी ठरली. पहिल्या दिवशी नांदुरी येथे पोहचताच बागलाण सायकलिस्टसच्या वतीने जोरदार स्वागत व सन्मान करण्यात आला.

सप्तशृंगी गड येथे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, विश्वस्त अॅड. ललित निकम, ग्रामपंचायत सदस्य राजू गवळी, शांताराम गवळी, जनसंपर्क अधिकारी वाबळे यांच्या वतीने या महिलांचा सत्कार करण्यात आला. आदिशक्ती सप्तशृंगी मातेचे दर्शन घेऊन कळवण- निवाणे मार्गे देवळा येथे ही सायकल मोहीम मुक्कामी पोहोचली. दुसऱ्या दिवशी ही मोहीम चिंच बारी मार्गे चांदवड येथे रेणूका मातेच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाली. रेणूका मातेचे दर्शन घेऊन तेथील मंदिराच्या आवारात भाविकांसमोर पथनाट्य सादर केले. तिसऱ्या दिवशी चाळीसगाव सायकलिस्टसोबत चंडिकादेवी दर्शनास मार्गस्थ झाले. कन्हेरगड, गौताळा औट्रमघाट अभयारण्य येथे भेट दिली. चंडिका देवीचे दर्शन घेऊन नस्तनपुर येथे ही मोहीम पोहचली. तेथील शनि महाराजांच्या दर्शनाला आलेल्या भाविकांसमोर पथनाट्य सादर केले. सायंकाळी सहा वाजता कोटमगाव येथे पोहचुन जगदंबा मातेचे दर्शन दर्शन घेतले व चोंडेश्वरी देवी येवला मंदिर परिसरात कोष्टी समाज विश्वस्त मंडळाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. रात्री येवला येथे मुक्काम करून चौथ्या दिवशी सकाळी सहा वाजता ही मोहीम नाशिककडे रवाना झाली.

या महिलांचे स्वागत करण्यासाठी नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे अनेक सदस्य सकाळी राईड करत काहीजण विंचूर तर काहीजण निफाडपर्यंत पोहोचले व शेवटच्या टप्प्यात सर्वांसोबत राईड करून महिलांना ऊर्जा दिली. कालिका मंदिर येथे येताच नाशिक सायकल फाउंडेशनने जंगी स्वागत केले. यावेळी नशिक सायकलिस्टस फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, उपाध्यक्ष चंद्रकांत नाईक, खजिनदार रवींद्र दुसाने व टीम मोठ्या संख्येने उपस्थित होती. कालिका मंदिर परिसर आनंदाने गजबजून गेला. कालिका मंदिर परिसरात महिला सबलीकरण या विषयावर पथनाट्य सादर करत "नरनारी एक समान, करे एक दुजे का सम्मान"," महिला सबलीकरण -आपली जबाबदारी "हा संदेश देत या राईड ची सांगता झाली.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT