उत्तर महाराष्ट्र

साक्रीच्या नगराध्यक्षपदी जयश्री पवार बिनविरोध ; उपनगराध्यक्षपदी भाजपचे बापू गीते

गणेश सोनवणे

धुळे : पुढारी वृत्तसेवा : साक्रीच्या नगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीच्या जयश्री पवार या बिनविरोध निवडून आल्या असून उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या बापू गीते यांनी शिवसेनेचे उमेदवार पंकज मराठे यांचा पराभव केला. गिते यांना 11 तर मराठे यांना पाच मते मिळाली आहेत. या निवडप्रक्रियेत काँग्रेसचा एकमेव नगरसेक गैरहजर राहिला. दरम्यान यावेळी बोलताना भाजपाचे धुळे महानगरध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी साक्रीकर जनतेचे आभार मानत साक्रीच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले.

साक्री नगरपंचायती मध्ये भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत आहे. भारतीय जनता पार्टीने 17 पैकी 11, शिवसेनेच्या चार, अपक्ष एक, आणि काँग्रेसने एक जागा घेतली आहे. बहुमत असून देखील नगराध्यक्ष निवडीत दगा फटका होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय जनता पार्टीने त्यांच्या सर्व नगरसेवकांना धुळे येथे हलवले होते. आज नियोजित वेळेत सर्व नगरसेवक विशेष सभेत हजर होते. उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. या सभेमध्ये नगराध्यक्ष पदासाठी जयश्री पवार यांचा एकमेव अर्ज असल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. मात्र उपनगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टी कडून बापू गीते तर आघाडी करून शिवसेनेचे पंकज मराठे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

या पदासाठी झालेल्या मतदानात बापू गिते यांना 11 मते मिळाली. तर पंकज मराठे यांना पाच मते मिळाली. काँग्रेसच्या नर्गिस पठाण या गैरहजर असल्याने त्यांचे मतदान झाले नाही. दरम्यान यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपाचे धुळे महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी सांगितले की, साक्रीकर जनतेने भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवून 11 जागा निवडून दिल्या आहेत. अकरा जणांच्या या क्रिकेट टीम मध्ये मी बारावा खेळाडू असून बारावा खेळाडू हा सर्व खेळाडूंना सोबत घेऊन काम करतो. त्याचप्रमाणे आपण साक्रीचा विकास रथ देखील पुढे नेणार आहोत. येत्या काही वर्षात साक्रीची तुलना शिरपूर बरोबर होईल ,अशी विकास कामे केली जातील. आमदार आणि खासदार निधी या शहराला कमी पडू देणार नाही असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT