

कसबा पेठ : पुढारी वृत्तसेवा
वातावरणातला गारवा कायम असला तरी फेब्रुवारी महिना सुरू झाल्याने उन्हाळ्यात उष्णतेपासून थंडावा मिळण्यासाठी लागणार्या विविध वस्तूंनी बाजारपेठेतील दुकाने सजू लागली आहेत. विशेषतः शुक्रवार पेठेतील बुरुड गल्लीतील अनेक दुकानांमध्ये बांबूपासून तयार केलेले पडदे, वाळ्याचे पडदे, पर्यावरणपूरक अशा दैनंदिन वापरातील वस्तू दाखल झाल्या आहेत.
उन्हाळा सुसह्य होण्याच्या दृष्टिकोनातून अनेक नागरिक बांबू, वाळा आदी पर्यावरणपूरक घटकांपासून तयार झालेल्या पडद्यांना प्राधान्य देतात. त्यामुळे उन्हाळा सुरू होण्याच्या अगोदरच बुरुड आळीतील अनेक दुकानांत बांबूपासून तयार केलेल्या अनेक वस्तू दाखल होतात आणि ग्राहकांचीही त्यांना पसंती मिळते.
येथील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पाहिजे त्या आकारात, पाहिजे त्या डिझाईनमध्ये आणि खिशाला परवडणारे बांबूचे पडदे जागेवरच बनवून मिळतात. बांबूचे पडदे (चिकाचे), वाळ्याचे पडदे, गवती चटई, बांबूची चटई, बांबूचे कंपाउंड, चटईचे कंपाउंड ग्राहकांच्या आवडीनुसार बनवून दिले जातात. घरगुती ग्राहक, हॉटेल व्यावसायिक, ढाबेवाले तसेच सोसायटी किंवा बंगल्यामध्ये उन्हाळ्यामध्ये याचा मोठा उपयोग होत असतो.
बुुरुड गल्लीत बांबूपासून बनवलेल्या हस्तकला वस्तूंची 25 दुकाने आहेत. येथे बांबू कोकणातून येतो. मोठे व्यापारी ते घेतात आणि त्यांच्याकडून आम्ही पाहिजे तसे घेतो. ग्राहकांच्या आवडीनुसार, ग्राहकांच्या घरी जाऊन मापानुसार पडदे करून व फिटिंग करून देतो. बांबूचे साहित्य पर्यावरणपूरक व इतर सजावट साहित्यापेक्षा कमी पैशात मिळते. त्यामुळे घरगुती ग्राहक, हॉटेल व्यावसायिकांची वस्तूंना विशेष मागणी आहे.
– अनंता मोरे, बांबू विक्रेते, बुरुड गल्ली
बांबूचे पडदे (चिकाचे) : 40 रुपये स्क्वेअर फूट
वाळ्याचे पडदे : 55 रुपये स्क्वेअर फूट
गवती चटई : 120 – 250 रुपये
बांबूची चटई : 100 रुपये
बांबूचे कंपाउंड : 70 रुपये स्क्वेअर फूट
चटई कंपाउंड : 30 रुपये स्क्वेअर फूट
जाळीचे कंपाउंड : 55 रुपये स्क्वेअर फूट
या वस्तूंच्या निर्मितीदरम्यान व वापरादरम्यान कोणतेही प्रदूषण होत नाही, त्यामुळे त्या पर्यावरणपूरक आहेत. बांबूचे पडदे वा बांबूच्या वस्तू घरातील व आजूबाजूचे वातावरण थंड ठेवतात.