नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र व नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि सिन्नर येथील सह्याद्री युवा मंचच्या वतीने आयोजित राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत बाद फेरीतील सामन्यांनी उत्तरोत्तर रंगत वाढत गेली. चुरशीच्या आणि रोमांचित सामन्यांमध्ये पुरुष गटांत महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, नाशिक त्रिमूर्ती, भारत पेट्रोलियम व मुंबई पोर्ट संघ उपांत्य फेरीत पोहोचले. महिला गटात नाशिकचा क्रीडा प्रबोधिनी, ठाणे होतकरू, मुंबई विश्वशांती हे संघ उपांत्य फेरीत दाखल झाले.
महिंद्रा व मध्य रेल्वेच्या सामन्यात रेल्वेच्या रायडरने केलेल्या चुका महिंद्राच्या पथ्यावर पडल्या. त्यामुळे महिंद्राने 12 गुणांनी मात दिली. त्रिमूर्ती नाशिक व बालवडकर पुणे संघात चुरशीचा सामना झाला. दोन सुपर रेड करत त्रिमूर्ती संघाने घेतलेली आघाडी शेवटपर्यंत राखली. बालवडकरला 19, तर त्रिमूर्तीला 25 गुण मिळाले. त्रिमूर्ती संघ विजयी झाल्याने नाशिकचे आव्हान टिकून राहिले. रिझर्व्ह बँक व भारत पेट्रोलियम संघात चुरशीचा सामना झाला. प्रो कबड्डी खेळाडू रिशांक देवाडियाची धार रिझर्व्ह संघाने बोथट करतानाच भारत पेट्रोलियम संघाने एकतर्फी विजय मिळविला. नीलेश शिंदेने 10 टॅकल पॉइंट घेतले. भारत पेट्रोलियम व मुंबई मनपा संघात पेट्रोलियम संघाला 51 गुण मिळाले. महानगरपालिका संघाला 4 गुणांवर समाधान मानावे लागले. सह्याद्री युवा मंच व मुंबई संघातील सामन्यात मुंबईने एकतर्फी सामना जिंकला. रुपाली मुंबई आणि रिझर्व बँक संघात चुरशीचा सामना झाला. आरबीआयच्या संघाने 2 गुणांनी रुपालीवर मात केली. महिलांच्या होतकरू व क्रीडा प्रबोधिनी या दोन्ही ठाण्यातील संघांत प्रबोधिनीने 10 गुणांनी विजय मिळविला. विश्वशांती मुंबई व रचना नाशिकमध्ये झालेला सामना बरोबरीत सुटला. ठाणे होतकरूने शिरोडकर मुंबईवर 14 गुणांनी विजय मिळविला. दरम्यान, पुरुषांच्या महिंद्रा आणि भारत पेट्रोलियम, तर महिलांच्या क्रीडा प्रबोधिनी नाशिक व ठाणे होतकरू संघांनी अंतिम फेरी गाठली. सायंकाळी उशिरापर्यंत रोमांचक सामन्यांचा थरार सुरू होता.
मुंबई पोर्टची शेवटच्या 10 मिनिटांत सामन्यावर पकड
मुंबई पोर्ट व मुंबई पोलिस सामन्याच्या अर्धवेळपर्यंत चुरस पाहायला मिळाली. मुंबई पोर्टने शेवटच्या 10 मिनिटांत सामन्यावर पकड मिळवून 34, तर पोलिस संघाने 23 गुण मिळवले. बाद फेरीत पुरुष गटात नाशिक संघाने 4 गुणांनी पालघरला पराभूत केले. मुंबई पोलिसांनी सुरुवातीपासूनच वर्चस्व ठेवले.