नाशिक : वैभव कातकाडे
राज्य शासनाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजनेपैकी महत्त्वाची असलेली योजना म्हणजे राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना. या अंतर्गत जिल्ह्यात 48 प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे आले आहेत. त्यापैकी 45 प्रस्ताव पूर्णत्वाच्या मार्गावर, तर तीन प्रस्ताव प्रलंबित आहेत.
शिक्षण विभागाच्या माध्यमिक विभागाकडे 31 प्रस्ताव दाखल असून, त्यापैकी 28 प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात, तर 3 प्रस्ताव प्रलंबित आहेत. प्राथमिक विभागाकडे 17 प्रस्ताव दाखल असून, संपूर्ण 17 प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकूण 48 प्रस्तावांपैकी 45 प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत. राज्य शासनाने पारित केलेल्या शासन निर्णयात ही योजना इयत्ता पहिली ते 12 वी पर्यंत शिकणार्या सर्व मुला-मुलींना लागू आहे. विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या घरच्यांना दीड लाख रुपये सानुग्रह अनुदान मिळते. त्यासाठी पहिला खबरी अहवाल, पोलिसांंनी केलेला स्थळ आणि इन्क्वेस्ट पंचनामा, सिव्हिल सर्जन यांचे शवविच्छेदन अहवाल किंवा सिव्हिल सर्जन यांच्या स्वाक्षरीतला मृत्यूू दाखला या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
अपघाताने विद्यार्थ्याचे 2 अवयव किंवा 2 डोळे किंवा 1 डोळा व 1 अवयव निकामी होऊन कायमचे अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये सानुग्रह अनुदान मिळते. यासाठी अपंगत्वाचे सिव्हिल सर्जन यांच्या स्वाक्षरीच्या प्रमाणपत्राची पूर्तता करणे आवश्यक आहे. अपघाताने 1 अवयव किंवा 1 डोळा कायमचा निकामी झाल्यास 75 हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळते. यासाठी अपंगत्वाचे सिव्हिल सर्जन यांच्या स्वाक्षरीच्या प्रमाणपत्राची पूर्तता करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यास अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यास प्रत्यक्ष हॉस्पिटलचा खर्च किंवा 1 लाख रुपये सानुग्रह अनुदान मिळते. त्यासाठी शस्त्रक्रियेबाबतचे हॉस्पिटलचे सिव्हिल सर्जन यांच्या स्वाक्षरीच्या पत्राची पूर्तता करणे आवश्यक असते. विद्यार्थी आजारी पडून तसेच सर्पदंशाने किंवा पोहताना मृत झाल्यास दीड लाख रुपयेे सानुग्रह अनुदान मिळते. त्यासाठी सिव्हिल सर्जन यांच्या स्वाक्षरीचा शवविच्छेदन अहवाल आवश्यक आहे. तसेच विद्यार्थी क्रीडा स्पर्धा खेळताना, शाळेतील जड वस्तू पडून, आगीमुळे तसेच विजेच्या धक्क्याने जखमी झाल्यास प्रत्यक्ष हॉस्पिटलचा खर्च किंवा 1 लाख रुपये सानुग्रह अनुदान मिळते. त्यासाठी शस्त्रक्रियेबाबतचे हॉस्पिटलचे सिव्हिल सर्जन यांच्या स्वाक्षरीच्या पत्राची पूर्तता करणे आवश्यक असते. या सानुग्रह योजनेत आत्महत्या, कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, अमली पदार्थांच्या अमलाखाली असताना झालेला अपघात, नैसर्गिक मृत्यू यांचा समावेश केलेला नाही. सानुग्रहाची मंजूर होणारी रक्कम विद्यार्थ्याची आई, आई हयात नसल्यास वडील, आई आणि वडील दोघेही नसल्यास सज्ञान भाऊ किंवा बहीण यांच्याकडे वर्ग होईल. दरम्यान, या योजनेत प्राप्त झालेले प्रस्ताव निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्यात जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा महापालिका उपआयुक्त, पोलिस अधीक्षक किंवा पोलिस उपआयुक्त, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा जिल्हा शल्य चिकित्सक हे सदस्य, तर प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी हे सदस्य सचिव असतात.
तालुकानिहाय प्रस्ताव असे…
त्र्यंबक – 3, दिंडोरी – 3, मालेगाव – 7, देवळा – 3, चांदवड – 2, येवला – 1, नाशिक – 11, सुरगाणा – 1, पेठ – 5,
नांदगाव – 1, बागलाण – 2, निफाड – 5, सिन्नर – 1, कळवण – 0.