मंचर; पुढारी वृत्तसेवा : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे पहाटे पाणी आणण्यासाठी गेलेले शेतमजूर बबन भागुजी केदारी (वय 55) यांचा मृतदेह पाच दिवसांनंतर रविवारी (दि. 4) सकाळी अकरा वाजता उसाच्या शेतात मिळाला. अवसरी बुद्रुक हद्दीतील गण्या- डोंगराच्या पायथ्याला बबन केदारी आणि त्यांची पत्नी मीना हे गेल्या अनेक वर्षांपासून राहात आहेत. बुधवारी (दि. 30 नोव्हेंबर) रोजी पहाटे पाणी आणण्यासाठी ते जवळील शेतामध्ये गेले होते. त्यानंतर ते घरी आलेच नाहीत.
त्यांचा शोध त्यांची पत्नी, मुले आणि नातेवाईकांनी घेतला. परंतु, ते आढळले नाहीत. त्यांच्या राहत्या घराजवळीलच रामहरी चौरे यांच्या शेतात उसाची तोड चालू असताना मजुरांना तेथे एका पुरुषाचा मृतदेह दिसला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते प्रताप हिंगे पाटील यांना याबाबत कळविले. त्यांनी शिवसेनेचे उपनेते कल्याण हिंगे यांना माहिती दिली. गावच्या पोलिस पाटील माधुरी जाधव यांनी मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर आणि वन खात्याच्या अधिकार्यांना माहिती कळवली.
वन खात्याचे अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन केदारी यांच्या कुटुंबीयांना बोलावले. सापडलेला मृतदेह बबन केदारी यांचा असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांनी पंचनामा करून मंचर उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी नेला. या घटनेची मंचर पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच केदारी यांचा मृत्यू कशाने झाला हे सांगणे योग्य ठरेल, असे मंचर वनपरीक्षेत्र अधिकारी प्रदीप रोधळ आणि वनपाल प्रदीप कासार यांनी सांगितले. बिबट्याची शक्यता त्यांनी फेटाळली.