Rain Pudhari
नाशिक

Nashik Unseasonal Rain: अवकाळीचे दाटले ढग; शेतकऱ्यांची चिंता गडद

निफाड, नांदगाव, येवल्यात पावसाची हजेरी : द्राक्ष, कांद्यासह रब्बी पिके धोक्यात

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्याच्या हवामानात अचानक मोठा बदल झाला असून, थंडी गायब होवून अवकाळी पावसाचे ढग दाटल्याने, शेतकऱ्यांची चिंता गडद झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच निफाड, नांदगाव, येवला तालुक्यात अवकाळीने हजेरी लावली. याशिवाय शुक्रवारी (दि. ३०) दिवसभर अवकाळीचे ढग दाटून आल्याने, ऐन काढणीच्या हंगामात रब्बी पिके धोक्यात आली आहेत. याशिवाय द्राक्ष आणि कांदा पिकांना देखील धोका निर्माण झाल्याने, शेतकरी चिंतेत सापडला आहे.

मागील काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडली होती. उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे जानेवारी महिन्यात देखील नाशिककरांना तीव्र थंडीचा सामना करावा लागेल, असा इशारा हवामान विभागाने यापूर्वीच दिला होता. मात्र, अचानक वातावरणात बदल झाल्याने, थंडी गायब होवून अवकाळीचे ढग दाटून आले आहेत. मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील नांदगाव, निफाड व येवला या तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.

याशिवाय राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी बरसल्याने, नाशिक जिल्ह्यालाही अवकाळीचा धोका निर्माण झाला आहे. सध्या रब्बी पिकांच्या काढणीचा हंगाम सुरू आहे. विशेषत: गहू आणि कांदा ही महत्त्वाची हंगामी पिके पुढच्या काही दिवसांवर काढणीवर आली आहेत. गहू पिक सध्या दाणे भरत असून, अवकाळी पाऊस बरसल्यास या पिकाचे मोठे नुकसान होणार आहे. पावसामुळे दाणे ओले होऊन सडण्याची, किडे लागण्याची भीती आहे. कांद्यालाही ओलावा अनुकूल नसल्याने पिकाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊन त्याचा फटका बाजारभावाला बसण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

गारवा शेतीसाठी घातक

ढगाळ वातावरणामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झाला आहे. हा गारवा शेतपिकांसाठी घातक असून, गहू, हरभरा, ज्वारी, मका, कांदा या पिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने, पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. काही भागात अवकाळी पाऊस बरसण्याचाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

द्राक्ष बागायतदार धास्तावले

अवकाळीचे ढग दाटून आल्याने, द्राक्ष बागायतदार धास्तावले आहेत. द्राक्षांच्या बागा सध्या फळधारणा आणि पक्वतेच्या टप्प्यात आहेत. अवकाळीमुळे फळे सडण्याची, फुटण्याची किंवा रोगराई होण्याची शक्यता वाढली आहे. विशेषतः निर्यातक्षम द्राक्षांच्या बागांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. द्राक्षांना ओलावा आणि कमी तापमानामुळे 'डाउनी मिल्ड्यू' सारखे रोग होण्याची शक्यता आहे. परिणामी उत्पादन २० ते ३० टक्क्यांनी घटण्याची भिती आहे.

या पिकांना धोका

गहू, हरभरा, मका, ज्वारी, कांदा, द्राक्ष, डाळींब, चारा पिके.

किमान तापमानात वाढ

ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. शुक्रवारी किमान तापमान १६.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. याशिवाय कमाल तापमानही २९.७ अंश सेल्सिअसवर पोहाेचले. निफाडचचे किमान तापमान १४.५ अंश सेल्सअसवर गेल्याने थंडी गायब झाली आहे. पुढील काही दिवस किमान तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT