

कोल्हापूर : वाढते शहरीकरण आणि प्रदूषणामुळे केवळ तापमानच वाढले नाही, तर चक्क ढगनिर्मितीची नैसर्गिक प्रक्रियाच बाधित झाली आहे. हवेतील प्रदूषित कणांमुळे (एरोसोल्स) ढगांच्या रचनेत अडथळे निर्माण होत असल्याने पावसाचे एकूण प्रमाण घटले आहे. मात्र जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा तो इतका तीव असतो की, वर्षाचा तब्बल 51.6 टक्के पाऊस अवघ्या दोन महिन्यांतच कोसळत आहे. शिवाजी विद्यापीठाच्या संशोधनातून हा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे.
सोप्या भाषेत सांगायचे तर कोल्हापूरला वर्षभरात जेवढे पाणी मिळते, त्यातील निम्मे पाणी निसर्ग फक्त 60 दिवसांत ओतून मोकळा होतो. उरलेले 10 महिने शहराला कोरड्या हवामानाचा सामना करावा लागतो. यामुळे धरणांचे नियोजन कोलमडते आणि शहरात पाणी साचण्याचे प्रकार वाढतात. शिवाजी विद्यापीठातील संशोधकांनी गेल्या तीस वर्षांतील देशातील 70 शहरांच्या पावसाचा अभ्यास केला.
यात कोल्हापूर, मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नांदेड, सांगली, सोलापूर आणि मालेगाव या महाराष्ट्रातील 11 शहरांचा समावेश आहे. संशोधनानुसार शहरांमधील उष्णता (अर्बन हीट आयलंड) आणि वाहनांचा धूर यामुळे आकाशात जाणाऱ्या बाष्पाचे रूपांतर पावसाच्या थेंबात होण्याच्या प्रक्रियेत बदल झाला आहे. प्रदूषित कणांमुळे ढग जास्त काळ पाणी धरून ठेवतात आणि जेव्हा बरसतात तेव्हा ढगफुटीसारखे कोसळतात.