

Maharashtra Unseasonal Rain: महाराष्ट्रात सध्या हवामानाचा लहरीपणा पाहायला मिळत असून, हिवाळ्याच्या शेवटी अचानक आलेल्या पावसाने नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. थंडीचा जोर कमी होत असतानाच राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे हिवाळा संपत असल्याचे संकेत दिसत आहेत. गेल्या 24 तासांत ठाणे, रायगड, नंदुरबारसह काही भागांत हलक्या सरी कोसळल्या, तर मुंबई, पुणे आणि उपनगरांमध्ये ढगाळ हवामान दिसत आहे.
हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे बाष्पयुक्त वारे सक्रिय झाले आहेत. या वाऱ्यांचा परिणाम थेट महाराष्ट्रावर होत असून, त्यामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. यामुळे हुडहुडी भरवणारी थंडी जवळपास गायब झाली असून, पुढील 24 तास राज्यात ढगाळ आणि दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. पेण तालुक्यातील जोहे आणि हमरापूर परिसरात पावसाच्या सरी बरसल्या. या पावसामुळे येथील गणपती मूर्ती कारखाने आणि वीटभट्ट्यांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कच्च्या मूर्ती आणि तयार नसलेल्या विटा पावसामुळे खराब होण्याची शक्यता आहे.
ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात सकाळी हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे ठाणेकरांना हिवाळ्यातच पावसाळी वातावरणाचा अनुभव आला. नवी मुंबईतही अनेक भागांत सकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. थंडीच्या दिवसांत अचानक आलेल्या पावसामुळे ऑफिसला जाणारे नागरिक, विद्यार्थी आणि कामगारांची चांगलीच तारांबळ उडाली.
भिवंडी शहर आणि ग्रामीण भागातही जानेवारी संपत असताना अचानक जोरदार पाऊस पडला. सकाळी मुलांना शाळेत सोडण्यासाठी, मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेले नागरिक अचानक आलेल्या पावसामुळे अडचणीत सापडले. जून-जुलै महिन्याची आठवण करून देणारा हा पाऊस जानेवारीतच पडल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
हवामान खात्याने आधीच पावसाचा इशारा दिला होता. पुढील काही तासांत राज्यातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.