भारत हा प्रजासत्ताक आणि सार्वभौम राष्ट्र असल्याची जाणीव करून देणारे आपले भारतीय संविधान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमातून व उदात्त विचारसरणीतून आकाराला आले आहे. ही जाणीव म्हणजेच आमची राष्ट्रीय अस्मिता व अभिमान असून, या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने आपल्या जबाबदाऱ्या व कर्तव्यांबाबत अधिक सजग राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध उद्योगपती तथा जैन इरिगेशन सिस्टिम्सचे चेअरमन मा. श्री. अशोक भाऊ जैन यांनी केले.
ते श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचारी श्रम संस्थेच्या भव्य प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या प्रजासत्ताक दिन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या विश्वस्त समितीचे चेअरमन मा. श्री. बेबीलालजी संचेती हे उपस्थित होते.
मा. श्री. अशोक भाऊ जैन यांनी सर्वप्रथम आपल्या शुभहस्ते ध्वजवंदन करून राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर २६ जानेवारीचे प्रमुख आकर्षण असलेल्या भव्य परेडची त्यांनी पाहणी केली. एनसीसी अंतर्गत संस्थेतील विविध विभागांच्या सहभागी झालेल्या सर्व प्लॅटूनच्या शिस्तबद्ध, तालबद्ध आणि अत्यंत आकर्षक परेडची सलामी त्यांनी स्वीकारली. विद्यार्थ्यांच्या शिस्त, आत्मविश्वास आणि राष्ट्रप्रेमाचे दर्शन घडविणाऱ्या या परेडने उपस्थितांची मने जिंकली. आपल्या मनोगतामध्ये माननीय अशोकजी जैन यांनी सांगितले की," आजवर मी अनेक ध्वजवंदनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलो आहे मात्र या संस्थेचा मी विश्वस्त आहे आणि ज्या संस्थेने माझ्यावर आणि मी ज्या संस्थेवर नितांत प्रेम केले त्यांनी संस्थेने आज मला प्रमुख अतिथी म्हणून जो सन्मान दिला, तो माझ्यासाठी विशेष अभिमानास्पद आहे. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सर्वप्रथम येणाऱ्या आणि सुवर्णपदकाच्या मानकरी ठरणाऱ्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीला एक लाख रुपयाचे बक्षीस देण्याचे त्यांनी याप्रसंगी जाहीर केले.
यानंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीत, शंभू वंदना समूहनृत्य तसेच Operation सिंदूर या विषयावर आधारित प्रभावी सादरीकरण सादर केले. या सादरीकरणातून देशभक्ती, त्याग, नारीशक्ती आणि राष्ट्रीय स्वाभिमान यांचे प्रभावी दर्शन घडले. संपूर्ण परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.
समारोपप्रसंगी संस्थेच्या वतीने प्रमुख अतिथी व अध्यक्षांचा सत्कार मा.श्री, अजित भाऊ सुराणा, मा.श्री. दिनेश भाऊ लोढा, मा.श्री. बाळासाहेब रवींद्रभाऊ संचेती या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, एनसीसी अधिकारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेतील सर्व विभागांचे सहकार्य लाभले.