

Gautami Gaikwad Sambal Vadan Video
अंजली राऊत
नाशिक: कलेला वयाचं बंधन नसतं हे नाशिकच्या गौतमी गायकवाडने अगदी बालवयातच सिद्ध करून दाखविले आहे. अवघ्या अडीच वर्षांची असल्यापासून आईसोबत तुळजाभवानी मंदिरात जाणारी गौतमी, तेथे होणाऱ्या संबळवादनाने अक्षरशः मंत्रमुग्ध होत असे. मंदिरात महामंडलेश्वर संजना भारती तुळजाभवानीच्या चरणी आपल्या संबळवादनाची सेवा सादर करत असत. त्या प्रत्येक ठेक्याकडे गौतमी एकटक पाहत राहायची. तिच्या डोळ्यातील कुतूहल आणि ओढ संजना भारती यांच्या लक्षात आली आणि तेथूनच एका सुंदर सुरेल संबळवादन प्रवासाची सुरुवात झाली.
सुरुवातीला खेळण्यासारखे संबळ वाजवणारी गौतमी, हळूहळू त्यातील लय, ताल आणि हातातील सहजता दाखवू लागली. तिच्या नैसर्गिक प्रतिभेची जाणीव होताच संजना भारती यांनी तिला व्यवस्थित संबळवादनाचे घडे देण्यास सुरुवात केली. मार्गदर्शन, सातत्य आणि गौतमीच्या मेहनतीमुळे तिची कला दिवसेंदिवस अधिक प्रगल्भ होत गेली.
महाराष्ट्र समाजसेवा संघ संचलित प्राथमिक शाळेत प्रवेश घेतल्यानंतर दुसरीपासूनच गौतमीमधील सुप्त गुण अधिक स्पष्टपणे दिसू लागले. मुख्याध्यापिका निशा बर्वे यांनी पालकांशी संवाद साधत गौतमीला बालकल्याण संमेलनात सहभागी करून घेण्याचा सल्ला दिला आणि तिला योग्य मार्गदर्शन रचना विद्यालयापासून गौतमीच्या संबळवादनाच्या कलेला खरी दिशा मिळाली. शिक्षक हेमराज साबळे यांनीही तिच्या कलेचे कौतुक करत सातत्याने प्रोत्साहन दिले. आज अवघ्या सातव्या वर्षी गौतमी अनेक संगीतबद्ध कार्यक्रमांमध्ये आत्मविश्वासाने संबळवादन सादर करत आहे. पंचवटी येथे नाशिक जिल्हा जैन सांस्कृतिक कला फाउंडेशनतर्फे आयोजित जैन सांस्कृतिक महोत्सवात रचना विद्यालयाच्या प्राथमिक विभागातील इयत्ता तिसरीत शिकणारी गौतमी सिद्धार्थ गायकवाड हिला संबळवादनातील उत्कृष्ट कौशल्याबद्दल 'संगीत कला पुरस्कार'
प्रदान करून सन्मानित करण्यात आलेले आहे. या गौरवप्रसंगी नाशिकमधील सुप्रसिद्ध उद्योजक मोहनलाल लोढा, कांतीलाल चोपडा, जैन गायक तरुण मोदी तसेच अनेक मान्यवर उद्योजक उपस्थित होते. सर्वांनी गौतमीचे मनापासून अभिनंदन करत तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याशिवाय प्रयास फाउंडेशनतर्फे कलिदास कलामंदिर येथे आयोजित 'जल्लोष लोककला उपक्रमात २०२५ आणि २०२६ मध्येही गौतमीला सन्मानित करण्यात आलेले आहे. नाशिकच्या या चिमुकल्या कलाकाराने आपल्या कलेच्या जोरावर संस्कृतीची परंपरा पुढे नेत अनेकांसाठी प्रेरणादायी ठसा उमटवला आहे.
गौतमीची प्रेरणा आहे आई 'राणी'
आई राणीमुळे गौतमी प्रत्येक ठिकाणी आत्मविश्वासाने संबळबादन करत आहे. घराशेजारी असलेले तुळजाभवानी मंदिरात दररोत आरतीच्या वेळी गौतमी आपली कला देवीचरणी अर्पण करत कलेचा सराव करत आहे. त्यामुळे तिच्या कलेला अजून धार मिळत आहे. वणीजवळील कोंडाना गाव येथील आजोबा गेंदाजी निरभवणे हे गोंधळ जागरणामध्ये संबळ वादन करत होते.
तुळजाभवानी मंदिरात संबळवादन करत असताना एक गौतमीची कला लक्षात आली. अवघ्या अडीच वर्षाची असताना गौतमीला संबळचा ठेका घ्यायला शिकवले. संबळातील गोंधळी चाल, खानदेशी, कोकणी पट्टा, डमरू वाद्यातील शिवतांडव यासारख्या पारंपरिक ताल संबळावर वाजवताना गौतमी अगदी लीलया ठेका धरते. एवढेच नाही तर दुसरा कोणी चुकला तर त्या ठेक्यातील नजाकत आणि दुरुस्तीही गौतमी सांगत असते. त्यामुळे भविष्यात ती खूप मोठी कलाकार होवो, असे आशीर्वाद देते.
महामंडलेश्वर संजना भारती, संबळवादक