

Girish Mahajan Ambedkar Row: देशभरात 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, नाशिकमधील एका कार्यक्रमात गोंधळ झाला. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन भाषण करत असताना एका महिला सरकारी कर्मचाऱ्याने अचानक उठून थेट प्रश्न विचारला, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव भाषणात का घेतलं नाही?” या घटनेमुळे कार्यक्रमस्थळी काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
या कार्यक्रमात जाब विचारणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचं नाव माधवी जाधव असून त्या वन विभागात कार्यरत असल्याची माहिती आहे. भाषणात बाबासाहेबांचं नाव न घेतल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली.
माधवी जाधव यांनी उपस्थितांसमोर आपली भूमिका ठामपणे मांडली. “ज्यांनी संविधान दिलं, लोकशाहीचा पाया घातला, त्या बाबासाहेबांचं नावच भाषणात नाही… हे चुकीचं आहे,” असं त्या म्हणाल्या. वाद वाढल्यानंतरही माधवी जाधव आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्या.
“मला सस्पेंड केलं तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही,” असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.
तसंच त्यांनी असंही म्हटलं की, “मला कोणतंही काम द्या. वाळूच्या गाड्या उतरवायला लावल्या तरी करेन, मातीचं काम दिलं तरी करेन. पण बाबासाहेबांची ओळख पुसली जाऊ देणार नाही.” माधवी जाधव यांनी सांगितलं की, भाषण सुरू असताना त्यांनी वाट पाहिली की ते कुठेतरी बाबासाहेबांचं नाव घेतील. पण शेवटपर्यंत ते नाव न घेतल्यामुळे त्यांनी आवाज उठवला.
लोकशाही आणि संविधान ज्यांच्यामुळे आहे, त्या व्यक्तीचं नाव प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात न घेणं ही गंभीर बाब आहे. या प्रकारानंतर कार्यक्रमस्थळी उपस्थित पोलिसांनी माधवी जाधव यांना ताब्यात घेतलं. या घटनेनंतर सोशल मीडियावरही चर्चा सुरू झाली आहे.