

त्र्यंबकेश्वर : पुढारी
केंद्र आणि राज्यात हिंदुत्ववादी सरकार असताना हिंदुधर्मीयांचा महोत्सव असलेल्या कुंभमेळ्याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्र्यंबकेश्वरच्या साधू - महंतांनी केला आहे. येथील निरंजनी आखाड्यात येथील सर्व १० आखाड्यांच्या साधूंची कुंभमेळा नियोजनाबाबत बैठक झाली. यावेळी साधू- मंहतांनी सरकारवर अनेक आरोप केले. येथे १० आखाडे आणि ६० हून अधिक आश्रम तसेच कुटिया आहेत. तेथील सर्व साधू महंतांनी कुंभमेळा नियोजनात होत असलेली चालढकल होत असल्याने बैठक घेतली. यात आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती महाराज यांनी शासनाने आमची फसवणूक केली आहे. अवघ्या काही महिन्यांवर कुंभमेळा असताना कोणतीही कामे दिसत नाहीत. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन त्र्यंबकला फिरकत नाहीत, तर प्राधिकरणाचे अधिकारी शेखर सिंह आखाड्यांच्या साधूंसमवेत संवाद साधण्यात अयशस्वी ठरल्याचा आरोप केला आहे. नगर परिषदेला कामे देऊ नयेत. येथे टक्केवारीमुळे कामाचा दर्जा राहणार नसल्याचाही आरोप केला आहे. महानिर्वाणी आखाड्याचे विश्वेश्वरानंद महाराज, निरंजनी आखाड्याचे धनंजयगिरी महाराज यांनी पाण्याची सुविधा, स्वच्छतागृहांची निर्मिती याबाबत प्रश्न उपस्थित केला. बडा उदासीन आखाड्याचे राम मुनी यांनी जमिनीविना मोबदला अधिग्रहणाबाबत शासनाचे अतिक्रमण असल्याचे टीका केली आहे. तसेच गोदावरीवरील घाट कचराकुंडी झाल्याचेही म्हटले आहे. नया उदासीन आखाड्याचे गोपालदास महाराज यांनी शासनाने १ कोटीच्या कामावर २५ टक्के जीएसटी लावल्याचा आरोप करत, असे असेल तर प्रत्यक्षात २५ लाखांचेही काम होणार नसल्याचे म्हटले आहे. डॉ. बिंदुजी महाराज यांनी पर्वकाल सुरू असताना वाहने त्र्यंबकेश्वरपासून ४० किमी दूर थांबवली जातात, तर रस्त्याचे रुंदीकरण कशासाठी? असा प्रश्न उपस्थित केला. बैठकीला जुना आखाड्याचे सचिव सहजानंद महाराज, अग्नी आखाड्याचे दुर्गानंद ब्रह्मचारी, रामानंद आर्य, सिद्धेश्वरानंद महाराज, अश्विननाथ महाराज, गोरक्षगिरी महाराज यांच्यासह सर्व आखाडे, आश्रम आणि कुटियांचे साधू- महंत उपस्थित होते.