नाशिक

Nashik News : नार खोऱ्यात घुमला जल आरक्षणाचा नारा

गणेश सोनवणे

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा, दिंडोरी, पेठ, हरसूल हद्दीतून वाहणाऱ्या दमणगंगा नदीखोऱ्यात नगरसेवक नितीन गांगुर्डे यांनी सुरू केलेल्या जल आरक्षण यात्रेला आदिवासी बांधवांचा जोरदार प्रतिसाद लाभत आहे. आदिवासी बांधवांचे विस्थापन थांबवण्यासाठी सर्व आदिवासी बांधवांनी स्वतःहून जनजागृतीचा श्रीगणेशा केला असून, नार नदीच्या खोऱ्यात जल संवर्धन, जल आरक्षणाचा नारा घुमत आहे.

संबधित बातम्या :

गेल्या पाच दिवसांपासून नार-पार, दमणगंगा, गोदावरी खोऱ्यात भविष्यातील पाणी आरक्षणासाठी दिंडोरीचे नगरसेवक नितीन गांगुर्डे यांनी जल आरक्षण यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा हरसूल, पेठमार्गे सुरगाणा तालुक्यातील कोहोर, हरसूल, ठाणापाडा येथे दाखल झाली. हरसूल परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. हरसूलला बाजारातून जल आरक्षणाची रॅली काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी "जल संवर्धन जल आरक्षण, वृक्ष लावा वृक्ष जगवा, पाणी आडवा पाणी जिरवा" आदी घोषणा दिल्या. हरसूलमधील अनिल बोरसे, पोपट महाले, ज्ञानेश्वर गावित, हुशार हिरकूड यांनी पाणी आरक्षणाबाबत आदिवासींना जागे होण्याचे आवाहन केले. आदिवासी बांधवांना विकासासाठी पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी ज्ञानेश्वर गावित यांनी केली.

यात्रेचे संयोजक नितीन गांगुर्डे यांनी सांगितले की दमणगंगा, नार-पार नदीखोऱ्यात पाण्याचा अभ्यास गरजेचा असून, आदिवासी बांधवांचे स्थलांतर थांबण्यासाठी ठिकठिकाणी लहान जलसाठे निर्माण करावे व शेतीला पाणी उपलब्ध करून द्यावे. जल परिषद अध्यक्ष देवीदास कामडी यांनी त्र्यंबकेश्वर, हरसूल मतदारसंघातील आदिवासींचा विकास साधण्यासाठी शिक्षण व आरोग्याच्या सुविधांची मागणी केली.

जल आरक्षण यात्रा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेवखंडी, नाचलोंडी, ठाणापाडा, हरसूल, तोरंगण, दलपतपूर, चिखलपाडा, खरशेत, आड, पाटे,कोहोर, घनशेत, कुळवंडी, कडवईपाडा, सारस्ते, ससुणे, चिरापाली आदी दमणगंगा नदीच्या खोऱ्यात फिरली. या भागातील महिलांनी डोक्यावरील हंडा उतरवण्याचा निश्चय केला. हरसूल येथे जल आरक्षण यात्रेचे स्वागत करण्यात आले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT