पुणेकरांसाठी पाचवा दिवसही पाऊसवार ; जनजीवन विस्कळीत | पुढारी

पुणेकरांसाठी पाचवा दिवसही पाऊसवार ; जनजीवन विस्कळीत

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शहरात रविवारीही सलग पाचव्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सुटीच्या दिवशीदेखील जनजीवन विस्कळीत झाले. सर्वच रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांना बाहेर पडणे कठीण झाले होते. दिवसभरात शहरात 4.4 मि.मी. पावसाची नोंद झाली, तर 24 तासांत 12 मि. मी. पावसाची नोंद झाली. सुरुवातील हलक्या पावसाने सुरुवात झाली. त्यामुळे मार्केट यार्ड भागात शेतकरी, विक्रेते आणि ग्राहकांची तारांबळ उडाली. सकाळच्या वेळी पितृपक्षात लागणारे साहित्य विक्री करणार्‍या विक्रेत्यांना बाजारातील आपल्या जागा बदलाव्या लागल्या. केळीची पाने, द्रोण विक्रेत्यांनी बंद दुकानांचा आसरा घेतला. कात्रज रस्ता ते शिवाजीनगरपर्यंत रस्त्यावर वाहनांची रांग लागली होती. रविवारी रात्री 9 नंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. एकाच वेगाने संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे प्रचंड गारवा निर्माण झाला.

सर्वत्र चिखलाचे साम्राज्य…
शहरातील सर्व पेठांत चिखलाचे साम—ाज्य तयार झाले. स्वारगेट स्थानकावर गावाला जाणार्‍या प्रवाशांचे हाल झाले. त्यानंतर दुपारी 2 पर्यंत उसंत घेतली. पुन्हा दुपारी 4 नंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. कात्रज, कोंढवा, मगरपट्टा, वडगावशेरी, नगर रस्ता या भागात रस्त्यावर पाणी वाहू लागल्याने वाहतूक कोंडी झाली होती.रविवारचा दिवस असूनही पुणेकरांनी घरीच राहणे पसंत केले. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. सायंकाळी सात वाजता पुन्हा पावसाने जोर धरला.

आजपासून जोर कमी होणार
राज्यात सर्वत्र पावसाचा जोर सोमवारपासून कमी होत आहे. आगामी तीन दिवस घाटमाथ्यावर मध्यम पावसाचा अंदाज असल्याने शहरात बुधवारपर्यंत हलका ते मध्यम पाऊस राहील. मात्र, पावसाचा वेग कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने रविवारी दिला.

हेही वाचा :

Back to top button