Nashik Municipal Election Result 2026 Pudhari
नाशिक

Nashik Municipal Election Result 2026: संकटमोचक गिरीश महाजन यांची जादू चालली, 'असा' विक्रम करणारा भाजप पहिलाच पक्ष

१२२ पैकी ७२ जागांवर भाजपचा दणदणीत विजय; नाशिक महापालिकेच्या इतिहासातील पहिलाच विक्रम

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नाशिकमध्ये भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांची जादू पुन्हा एकदा चालली आहे. नाशिकला आधुनिक शहर बनवण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवत नाशिककरांनी पुन्हा एकदा भाजपच्या झोळीत सत्तेचे दान टाकले आहे. १२२ पैकी तब्बल ७२ जागांवर दणदणीत विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा महापालिकेची सत्ता एकहाती काबीज करणारा भाजप नाशिक महापालिकेच्या इतिहासातील पहिलाच पक्ष ठरला आहे.

राज्यातील महायुतीच्या सत्तेत घटकपक्ष असलेल्या शिवसेना (शिंदेगट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) युतीने अनुक्रमे २६ व ४ जागांवर विजय मिळवत विरोधी पक्षनेतेपदाला गवसणी घातली आहे. भाजपची घोडदौड रोखण्याचा उबाठा, मनसेचा प्रयत्न तोकडा ठरला असून, उबाठाला जेमतेम १५, तर मनसेला एकच जागा मिळाली. प्रचारात कुठेही न दिसलेल्या काँग्रेसच्या वाट्याला ३ जागा आल्या आहेत. मुकेश शहाणे यांच्या रूपाने अपक्षाचा महापालिकेत चंचूप्रवेश झाला आहे. राष्ट्रवादी (श. प) रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), वंचित, आप, माकप, रिपब्लिकन सेना, एमआयएमला या निवडणुकीत खातेही खोलता आले नाही. तब्बल ८ वर्षे ११ महिन्यांनंतर झालेल्या महापालिकेच्या सातव्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल मतमोजणीद्वारे शुक्रवारी (दि. १६) जाहीर करण्यात आला.

१०० प्लसचा दावा करत स्वबळावर रिंगणात उतरलेली भाजप, महापालिकेच्या सत्तेवर स्वार होण्यासाठी युती करत मैदानावर उतरलेली शिवसेना (शिंदेगट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट), भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीद्वारे मैदानात उतरलेली शिवसेना (उबाठा), मनसे, काँग्रेस व राष्ट्रवादी (श.प. पक्ष), माकप तसेच स्वतंत्रपणे निवडणूक लढवणारी वंचित, आप, एमआयएम या पक्षांच्या उमेदवारांनी निवडणूक रण चांगलेच तापवले होते. गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदान ५ टक्क्यांनी घटले. ५६.६७ टक्के मतदान झाल्याने याचा फायदा कुणाला, असा सवाल उपस्थित केला जात होता.

अपेक्षेप्रमाणे घटलेल्या मतदानाचा फायदा सत्तारुढ भाजपलाच झाल्याचे समोर आले. या निवडणुकीत सर्वाधिक ११५ जागा लढवणाऱ्या भाजपने तीन उमेदवार पुरस्कृत केले होते. यापैकी सर्वाधिक ७२ जागांवर विजयश्री मिळवत भाजपने नाशिक महापालिकेच्या सत्तेवर सलग दुसऱ्यांदा नाव कोरले आहे. भाजपच्या माजी महापौर रंजना भानसी, माजी उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौरी आहेर - आडके, सुरेश पाटील, सुधाकर बडगुजर, दिनकर पाटील, शाहू खैरे या दिग्गजांना यश मिळाले. शिवाजी गांगुर्डे, संभाजी मोरुस्कर, दिनकर आढाव या दिग्गजांचा मात्र पराभव झाला.

शिवसेना पुन्हा विरोधी बाकावर

महापालिकेवर भगवा फडकवण्याचा निर्धार केलेल्या शिवसेनेच्या वाट्याला २६ जागांवर मजल मारता आली. शिवसेनेबरोबर युतीत असलेल्या राष्ट्रवादीला (अजित पवार गट) केवळ ५ जागा मिळाल्या. शहरात शिवसेना शिंदेगट व राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद भाजपने युतीच्या चर्चेदरम्यान देऊ केलेल्या जागा एवढीच असल्याचे स्पष्ट झाले. शिवसेनेला विरोधी पक्षाची भूमिका बजवावी लागणार आहे. शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते, विलास शिंदे, प्रवीण तिदमे, कमलेश बोडके, रंजना बोराडे, राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) डॉ. हेमलता पाटील या दिग्गजांना पुन्हा महापालिकेत येण्याची संधी मिळाली.

उबाठा - मनसे युती प्रयोग अयशस्वी

भाजपला रोखण्यासाठी उबाठाने महाविकास आघाडीची मोट बांधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाने साथ दिली नसल्याने महाविकास आघाडीचा प्रयोग अयशस्वी ठरला आहे. उबाठाने ७९ जागा लढवताना १५ जागांवर यश मिळवले. मनसेला ४२ जागा लढताना एका जागेवर समाधान मानावे लागले. काँग्रेसलाही तीन जागांची लॉटरी लागली आहे. कॉंग्रेसने प्रभाग १४ मध्ये ३ जागा जिंकून महापालिकेत अस्तित्व राखले. राष्ट्रवादी (श.प.) पक्षासह माकप, वंचित व अन्य छोट्या पक्षांना एकही जागा मिळवता आली नाही. उबाठाला मिळालेल्या जागांमुळे पक्षाचे अस्तित्व कायम राखण्यात नेतृत्वाला यश आले.

नाशिक महापालिकेतील निकाल

भाजप - ७२

शिवसेना (शिंदे गट) - २६

राष्ट्रवादी (अजित पवार गट) - ४

शिवसेना (उबाठा) - १५

काँग्रेस - ३

मनसे - १

अपक्ष - १

एकूण - १२२

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT