

Jalna Municipal Corporation Result 2026 BJP Victory
सुहास कुलकर्णी
जालना : जालना महानगरपालिकेच्या पहिल्याच ऐतिहासिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विरोधकांचा धुव्वा उडवत एकहाती सत्ता काबीज केली आहे. एकूण ६५ जागांपैकी तब्बल ४२ जागांवर विजय मिळवत भाजपने महापालिकेचा गड सर केला. या निवडणुकीत शिवसेनेला (शिंदे गट) १२, काँग्रेसला ८, एमआयएमला २ तर एका अपक्षाला विजय मिळाला आहे. विशेष म्हणजे, महायुतीचा भाग असूनही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार व शरद पवार गट) आणि मनसेची पाटी कोरीच राहिली आहे.
जालना पालिकेचे महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. हा गड सर करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कंबर कसली होती. पालिकेवर मजबूत पकड असलेले काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांना ऐनवेळी पक्षात प्रवेश देत दानवे यांनी विजयाची मुहूर्तमेढ रोवली होती. भाजप कार्यकर्त्यांचे मजबूत नेटवर्क आणि त्याला गोरंट्याल यांच्या जनसंपर्काची जोड मिळाल्याने भाजपने हे ऐतिहासिक यश संपादन केले. जालना पालिकेच्या इतिहासात भाजपला प्रथमच अशी एकहाती सत्ता मिळाली आहे.
दुसरीकडे, भाजपच्या या लाटेत शिवसेनेचे (शिंदे गट) नेते माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी निकराची लढत दिली. त्यांनी आपल्या पक्षाचे १२ उमेदवार निवडून आणत शहरात शिवसेनेचे अस्तित्व टिकवून ठेवले. मात्र, काँग्रेसला केवळ ८ जागांवर समाधान मानावे लागले. भाजपच्या या वादळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना मतदारांनी साफ नाकारले.
दिग्गजांच्या घरात विजयाचा गुलाल
या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचे नातेवाईक विजयी झाले आहेत.
दानवे कुटुंब : रावसाहेब दानवे यांचे बंधू तथा शहराध्यक्ष भास्करराव दानवे आणि त्यांच्या पत्नी सुशिलाताई दानवे विजयी झाल्या.
गोरंट्याल कुटुंब : माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्या पत्नी संगीताताई गोरंट्याल आणि मुलगा अक्षय गोरंट्याल यांनी बाजी मारली.
खोतकर कुटुंब : माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांची कन्या दर्शना झोल (प्रभाग क्र. १६) विजयी झाल्या.
ढक्का कुटुंब : महावीर ढक्का आणि त्यांचा मुलगा विक्रांत ढक्का हे पिता-पुत्र विजयी झाले.
एमआयएमची एन्ट्री
निवडणुकीत एमआयएमने २ जागा जिंकत महापालिकेत प्रवेश केला आहे. एकूण ७ मुस्लिम उमेदवार निवडून आले असून त्यात काँग्रेसचे ३, एमआयएमचे २, शिवसेनेचा १ आणि भाजपच्या एका मुस्लिम उमेदवाराचा समावेश आहे.