नाशिक : शासकीय सदनिकेच्या गैरव्यवहार प्रकरणी शिक्षा ठोठावण्यात आलेले माजी क्रीडामंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसाठी नाशिक पोलीस आयुक्तालयाचे पथक लीलावती रुग्णालय मुंबई येथे दाखल झाले आहे. सदर पथकामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्यासह १३ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक आहे.
आज दुपारी पोलीस आयुक्तालयातून हे पथक मुंबईसाठी निघाले होते त्यानंतर सुरुवातीस वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये जाऊन कोकाटे यांच्या अटके संबंधित पूर्तता पूर्ण केली त्यानंतर रात्री अकरा वाजता सदर पथक हे लीलावती रुग्णालयात दाखल झाले.
शासकीय सदनिका बेकायदेशीर रित्या मिळवल्याप्रकरणी माजी मंत्री माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना दोषी सत्र न्यायालयाने ठरविले त्यानंतर त्यांचे त्यांना अटकेचे आदेश देण्यात आले. या पार्श्वभूमीवर सदर पथक कोकाटे यांना अटक करण्यासाठी लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहे.
कॉलेजरोड परिसरातील विसे मळ्यात असलेल्या इमारतीतील चार सदनिका मुख्यमंत्री १० टक्के योजनेअंतर्गत तत्कालीन आमदार असलेले माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी अल्पउत्पन्नाचे बनावट कागदपत्र सादर करीत मिळविल्या होत्या. त्याविरोधात दिवंगत तुकाराम दिघोळे यांनी कोकाटे यांच्यावर आरोप केल्याने याप्रकरणी डिसेंबर १९९५ मध्ये सरकारवाडा पोलिसात फसवणूक व बनावट दस्ताऐवजाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचप्रकरणी नाशिक कनिष्ठ न्यायालयाने त्यांना गेल्या २० फेब्रुवार २०२५ रोजी दोन वर्ष कारावास आणि प्रत्येकी ५० हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली होती. तोच निकाल नाशिक सत्र न्यायालयाने मंळवारी (ता. १६) कायम ठेवला.
त्यामुळे बुधवारी (ता. १७) नाशिक कनिष्ठ न्यायालयाने कोकाटे यांच्या अटकेसाठी विनाजामिनापत्र अटक वॉरंट जारी केले होते. अटक वॉरंट शहर पोलिस आयुक्तालयास गुरुवारी (दि. १८) प्राप्त होताच, शहर गुन्हेशाखेचे दोन अधिकारी व अंमलदारांचे एक पथक माजी मंत्री कोकाटे यांच्या अटकेसाठी मुंबईला रवाना करण्यात आले आहे. कोकाटे सध्या लिलावती हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचारार्थ दाखल आहेत. न्यायालयाने सदरचे अटक वॉरंट जारी करताना, ‘माणिकराव कोकाटे यांना पकडून आणून न्यायालयासमक्ष उपस्थित करा, असे आदेशच दिला आहे