

देवळा : देवळा तालुक्यातील चिंचवे चौफुली ही आता अपघातांची नव्हे, तर थेट मृत्यूची वाट बनली आहे. बुधवारी (दि. १७) रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास भरधाव वाहनाच्या धडकेत चिंचवे येथील रहिवासी वसंत महादू पवार(६९) हे जागीच ठार झाले . हा अपघात नसून, ढिसाळ रस्ता व्यवस्थेचा आणि प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा थेट परिणाम असल्याचा संताप उपस्थित ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केला.
वसंत पवार हे घराकडे जात असताना चिंचवे येथील मुख्य चौफुलीवरील धोकादायक डिव्हायडर ओलांडत होते. त्याच वेळी चांदवडच्या दिशेने अतिवेगात आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्यांना उडवले. यात पवार यांच्या डोक्याला जबर मार बसून ते रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर कोसळले. विशेष म्हणजे, अपघातानंतर बराच वेळ प्रशासनाचा पत्ता नव्हता, नागरिकांनीच धाव घेत मदतकार्य केले.
जखमी अवस्थेत पवार यांना रुग्णवाहिकेतून मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. एका कुटुंबाचा कर्ता पुरुष प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे कायमचा हिरावला गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी ,सून,नातवंडे असा परिवार आहे .
या घटनेचा देवळा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनावर गुन्हा दाखल करण्यात येत असून,अधिक तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे .