

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
चांदीने गेल्या शुक्रवारी (दि.१२) दोन लाखांचा टप्पा पार केल्यानंतर, दरवाढीचा वेग कायम ठेवला आहे. बुधवारी (दि. १७) चांदीत आठ हजारांनी वाढ नोंदविली गेल्याने, चांदी दराने सर्वकालीन उच्चांक प्राप्त केला आहे. चांदीत होत असलेली वाढ बघता, आता चांदी दोन लाखांच्या खाली येण्याच्या आशा जवळपास मावळल्या आहेत.
याशिवाय नव्या वर्षात चांदी दर आणखीही उच्चांक नोंदविणार असल्याचा अंदाज आहे. दुसरीकडे सोने दरानेही दीड लाखाच्या दिशेने आगेकूच सुरू ठेवली आहे. जागतिक मागणीत वाढ, मागणीच्या तुलनेत अपुरा पुरवठा, उद्योग क्षेत्रात वाढती मागणी, भारतात सणासुदीत होणारी मागणी, डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होणे, युद्धाची स्थिती, सुरक्षित गुंतवणूक म्हणून चांदीकडे वाढता दृष्टिकोन आदी कारणांमुळे चांदी दरवाढीने पकडलेला वेग वाढता वाढतच आहे.
बुधवारी चांदीत आठ हजारांनी वाढ झाल्याने, चांदीने सर्वकालीन उच्चांकी दोन लाख आठ हजार ६० रुपयांचा आकडा गाठला आहे. सप्ताहाच्या प्रारंभी चांदी दराने विक्रमी दोन लाख एक हजार ८८० रुपयांची वाढ नोंदविली होती. त्यात दोनच दिवसांत जवळपास आठ हजारांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे सोने दराचीही विक्रमी आगेकूच सुरू आहे.
बुधवारी २४ कॅरेट सोने प्रती १० ग्रॅम जीएसटीसह एक लाख ३६ हजार ८९० रुपयांवर पोहोचले. तर २२ कॅरेट सोन्यानेदेखील एक लाख २५ हजार ९४० रुपयांचा आकडा पार केला आहे. सोने-चांदीतील दरवाढ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली असून, नव्या वर्षात आणखी विक्रमी स्तरावर जाण्याचा अंदाज जाणकारांकडून वर्तविला जात आहे.
गुंतवणूकदार सक्रिय, सराफांना तोटा अमेरिका लवकरच व्याजदर कमी करू शकते, ज्यामुळे लोक सोने आणि चांदीसारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत असून, चांदीची खरेदी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने, त्याचा थेट परिणाम सराफ बाजारातील किमतीवर होत आहे.