

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात गर्दीचे नियोजन व वाहतूक व्यवस्थापनासाठी शहरातील मुख्य चौकांत पीपीपी तत्त्वावर एआय प्रणालीवर आधारित ६० अॅडॅप्टिव्ह ट्रॅफिक कंट्रोल सिस्टिम (एटीसीएस) प्रकल्प राबवण्यात येणार आहे.
स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवला जात असून, यासंदर्भात स्मार्ट सिटी, नाशिक मनपा व खासगी ठेकेदारांत त्रिसदस्यीय करार करण्यास महासभेने प्रशासकीय मंजुरी दिली आहे.
गेल्या काही वर्षांत नाशिक शहरात वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. वाहनतळांचा प्रश्न कायम असल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविक नाशिकमध्ये येणार असल्याने गर्दीचे नियंत्रण व वाहतुकीचे नियोजन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
मनपा हद्दीत सद्यस्थितीत ४० एटीसीएस सिग्नल आहेत. अतिरिक्त ३० सिग्नलची मागणी आहे. त्यामुळे शहरात ३० ठिकाणी डिजिटल सिग्नल उपयुक्त ठरणार आहेत. येत्या सिंहस्थ कुंभमेळा कालावधीत एटीसीएस या प्रणालीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीचे व्यवस्थापन करता येणार आहे.
गर्दीची ठिकाणे व वेळेचा अभ्यास करत सिग्नल यंत्रणेचा वेळ कमी-अधिक केला जाऊ शकतो. यामुळे वाहतूक कोंडी कमी करता येऊ शकणार आहे. त्याचप्रमाणे व्हीएमडी बोर्डावर वास्तविक वेळेचा संदेश दिला जाऊ शकतो. रस्ता डायव्हर्जन, बंद रस्ता, सार्वजनिक सुरक्षेसंदर्भात सूचना, आपत्कालीन सूचना, ग्रीन कॉरिडोर, आपत्कालीन वाहनांना प्राधान्य, मोठ्या धार्मिक कार्यक्रमांसाठी गर्दी वाढल्यास त्वरित पर्यायी मार्ग सुचविणे हा व्हीएमडी बसवण्यामागील उद्देश आहे.
'एटीसीएस' म्हणजे काय
एटीसीएस ही एक ट्रॅफिक मॅनेजमेंट प्रणाली आहे. ज्यात ट्रॅफिक सिग्नलची वेळ वास्तविक ट्रॅफिक मागणीनुसार बदलते किंवा जुळवून घेते. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे दोन्ही अॅडॅप्टिव्ह ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीमचा वापर करत साध्य केले जाते.
अशी आहे 'व्हीएमडी' यंत्रणा
व्हीएमडी यंत्रणेद्वारे महामार्गांवर दिसणारे मोठे डिजिटल बोर्ड जे रहदारीची माहिती, अपघात किंवा हवामानाबद्दलचे संदेश बदलून दाखवतात. त्याचबरोबर शॉपिंग, मॉल्समध्ये किंवा विविध दुकानांमधील डिस्प्लेद्वारे नवीन ऑफर्स किंवा उत्पादनांची माहिती दिली जाते.