Maharashtra ration grain ATM news pudhari
नाशिक

Maharashtra ration grain ATM news: आता ३५ सेकंदात मिळणार रेशन धान्य; नाशिकमध्ये सुरू झालं पहिलं धान्य ATM

कुंभ मेळ्यातही या धान्य ATM चा फायदा होणार असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

Anirudha Sankpal

Maharashtra ration grain ATM news: नागरिकांना हक्काचे धान्य पारदर्शकतेने आणि सन्मानाने मिळावे यासाठी राज्य शासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिक येथे राज्यातील पहिल्या स्वयंचलित 'धान्य एटीएम'चे (अन्नपूर्ती यंत्रणा) लोकार्पण करण्यात आले. युनोच्या (UN) विशेष अर्थसहाय्यातून साकारलेला हा प्रकल्प नाशिकनंतर आता ठाणे आणि नागपूर शहरातही लवकरच सुरू केला जाणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.

अवघ्या ३५ सेकंदात मिळणार धान्य

लोकार्पण प्रसंगी बोलताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, "रेशन दुकानातून पूर्ण धान्य मिळत नाही किंवा मापात पाप होते, अशा अनेक तक्रारी नेहमी येत असतात. राज्यात तब्बल ५४ हजार रेशन दुकाने असून या यंत्रणेतील गैरप्रकारांना चाप बसवण्यासाठी 'अन्नपूर्ती स्वयंचलित यंत्रणा' अत्यंत प्रभावी ठरेल. या धान्य एटीएममुळे आता अवघ्या ३५ सेकंदात लाभार्थ्याला त्याचे हक्काचे धान्य २४ तास उपलब्ध होणार आहे. यामध्ये बायोमेट्रिक आणि ई-पॉस यंत्रणा असल्याने धान्याची चोरी किंवा फसवणूक होण्यास अजिबात वाव उरणार नाही. रेशन धान्य वाटप हे सरकारचे उपकार नसून गरजू नागरिकांचा तो हक्क आहे."

'वन नेशन वन कार्ड'चा मोठा फायदा; कुंभमेळ्यातील भाविकांनाही लाभ

छगन भुजबळ यांनी 'वन नेशन वन कार्ड' या संकल्पनेवर विशेष भर दिला. महाराष्ट्रात कामाच्या आणि रोजगाराच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित (फ्लोटिंग) लोकसंख्या येते. देशात 'वन नेशन वन कार्ड' योजनेचा सर्वाधिक वापर महाराष्ट्रातच केला जात आहे. आगामी नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातून येणाऱ्या भाविकांना आणि नागरिकांनाही या एटीएमचा मोठा फायदा होणार आहे. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांनी सोबत आपले रेशन कार्ड ठेवल्यास त्यांना नाशिकमध्ये कुठेही धान्याचा लाभ घेता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई अन् अधिकाऱ्यांना कडक इशारा

शासकीय नोकरी, गाड्या-घोडे असूनही बेकायदेशीरपणे रेशनचा लाभ घेणाऱ्या अपात्र लोकांना योजनेतून बाहेर काढण्याची मोहीम सुरू असल्याचे सांगत भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना कडक इशारा दिला. "गोडाऊनमधून धान्य निघाल्यापासून ते थेट लाभार्थ्यांच्या हातात पडेपर्यंत त्यावर आमचे बारकाईने लक्ष आहे. तंत्रज्ञानामुळे आता कोणी किती धान्य घेतले, याची माहिती थेट दिल्लीत कळते. ही योजना फक्त उद्घाटनापुरती राहता कामा नये, उद्या दुकान बंद राहिल्याची किंवा तक्रार आल्यास मी थेट जाब विचारणार, 'नाहीतर देणे के लेने पडेंगे'," असा सज्जड दम त्यांनी प्रशासनाला दिला.

धान्य एटीएमची प्रमुख वैशिष्ट्ये:

  • २४ तास धान्य वितरण: २४ तास सुरू राहणाऱ्या या स्वयंचलित एटीएममुळे नागरिकांना कधीही धान्य घेता येईल.

  • ३५ सेकंदात धान्य उपलब्ध: बायोमेट्रिक (अंगठा लावल्यानंतर) पडताळणी होऊन अवघ्या ३५ सेकंदात धान्य बाहेर येईल.

  • साठा क्षमता: या मशीनमध्ये एकावेळी २५ क्विंटल धान्य साठवण्याची क्षमता आहे.

  • पारदर्शकता: मापात होणारी फसवणूक आणि काळाबाजार पूर्णपणे बंद होईल.

  • लाभार्थी प्रमाण: अंत्योदय योजनेअंतर्गत ३५ किलो, तर प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत प्रति व्यक्ती ५ किलो धान्य वितरित केले जाणार आहे.

नाशिक जिल्ह्यात एकूण ३९ लाख लाभार्थी आणि २,६०८ रेशन दुकाने असून, टप्प्याटप्प्याने ही आधुनिक धान्य एटीएम मशीन सर्व ठिकाणी उपलब्ध करून दिली जातील, असा विश्वास मंत्री छगन भुजबळ यांनी शेवटी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT