

नाशिक : तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी निघालेल्या नाशिकच्या भाविकांवर काळाने घाला घातला. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर संकेश्वरजवळील गोटूर गावच्या हद्दीत सोमवारी (दि. १२) सकाळी आठच्या सुमारास कार आणि मालवाहू ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कारचालक पंकज गोकुळ बाविस्कर (वय ३५, रा. जाधव संकुल, अंबड लिंक रोड, नाशिक) यांचा जागीच मृत्यू झाला; तर कारमधील अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे नाशिकमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंकज बाविस्कर हे आपल्या चार मित्रांसह कारने (क्रमांक : एमएच १५ एलए ६८०९) तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी निघाले होते. दरम्यान, कोल्हापूरहून बेळगावच्या दिशेने जात असलेला मालवाहू ट्रक (क्रमांक : एमएच १४ एमटी २२०१) गोटूर गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर उलटला. त्याच वेळी मागून येणाऱ्या कारची उलटलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक बसली.
ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला. अपघातात कारचालक पंकज बाविस्कर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला; तर सतीश बाविस्कर, कल्पेश शिवकर, रोहित देव आणि रोशन हे चौघे गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
देवदर्शनासाठी निघालेल्या तरुणांवर वाटेतच काळाने झडप घातल्याने बाविस्कर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.