

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० वरील द्वारका सर्कल ते दत्त मंदिर चौक या सुमारे ५.६५० किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या सहापदरीकरणाचा मार्ग मोकळा करण्यासाठी ४५ मीटर रस्ता रुंदी उपलब्ध करून देण्याची अट केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने घातली आहे.
याबाबत नाशिक महापालिकेने ही ४५ मीटर रुंदीची जागा उपलब्ध करून देण्याची स्थिती स्पष्ट करावी, असे निर्देश मंत्रालयाच्या प्रादेशिक कार्यालयाने दिले आहेत. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या प्रादेशिक कार्यालयाकडून नाशिक महापालिका आयुक्तांना यासंदर्भात पत्र पाठवण्यात आले आहे.
या प्रकल्पाला मंत्रालयाने ३ जून २०२६ रोजी मंजुरी दिली असून, त्यासाठी सुमारे २९.५२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. मंत्रालयाच्या प्रकल्प तांत्रिक नोंदीनुसार, द्वारका सर्कल ते दत्त मंदिर चौक हा ५.६५० किमीचा मार्ग सध्या २४ ते ३० मीटर रुंदीच्या रस्ता हक्क क्षेत्रात आहे.
प्रस्तावित प्रकल्पात हा मार्ग सहापदरी करण्याबरोबरच दोन्ही बाजूंना दोनपदरी सेवा रस्ते उभारण्याचे नियोजन आहे. हे काम एकूण ४५ मीटरमध्ये सामावून घेण्यात येणार आहे. त्यासाठी नाशिक महापालिकेने ४५ मीटर रस्ता रुंदी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
भूसंपदानाबाबतही टप्पे निश्चित:
महामार्ग प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी भूसंपदानाची प्रक्रिया ठरलेल्या टप्प्यांनुसार पूर्ण करणे आवश्यक असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. आवश्यक ४५ मीटर रुंद रस्त्यापैकी ९० टक्क्यांहून अधिक क्षेत्रासाठी कलम ३ डी अंतर्गत अधिसूचना निविदा स्वीकारण्यापूर्वी जारी करणे अपेक्षित आहे.
तसेच, आवश्यक ४५ मीटर रुंद रस्त्यापैकी ९० टक्क्यांहून अधिक क्षेत्रासाठी कलम ३ जी अंतर्गत निवाडा 'लेटर ऑफ अवॉर्ड' देण्यापूर्वी जारी करणे आवश्यक आहे. त्यानंतर किमान ९० टक्के रस्त्याचा प्रत्यक्ष ताबा कलम ३ जी अंतर्गत निवाड्यानंतर आणि प्रकल्पाच्या नियुक्त दिनांकापूर्वी किंवा त्या दिवशी उपलब्ध करून देणे बंधनकारक असल्याचे मंत्रालयाने नमूद केले आहे.
त्यामुळे ४५ मीटर रुंद रस्ता उपलब्ध आहे की नाही तसेच त्याबाबतची महापालिकेची निश्चित भूमिका काय आहे, याची माहिती तातडीने देण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. रस्ता उपलब्धतेबाबत स्पष्टता झाल्यानंतरच निविदा, भूसंपदान आणि प्रत्यक्ष काम सुरू करण्याच्या पुढील प्रक्रियेला गति मिळण्याची शक्यता आहे.